बनावट आयडीचा वापर करून प्रतिस्पर्धी कंपनीच्या प्रमुखावर #मीटूचा आरोप करणाऱ्या तरुणाला अटक

मैत्रिणींवर पूर्वी काम करत असणाऱ्या जाहिरात कंपनीत अत्याचार झाल्याचा #मिटू अंतर्गत दावा करत, त्या कंपनीच्या प्रमुखाची बनावट ओळख निर्माण करून बदनामी करणाऱ्या २७ वर्षीय तरुणाला पवई पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. उत्कर्ष मेहता असे या तरुणाचे नाव असून, सेंट झेविअर्स कॉलेजमधून जाहिरात आणि जनसंपर्क पदवीधर असलेला उत्कर्ष प्रतिस्पर्धी जाहिरात कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे.

जाहिरात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक असणारे सुदर्शन बॅनर्जी यांच्या विरोधात सोशल मिडियामध्ये ८ आणि १२ ऑक्टोबरला #मीटू अंतर्गत पोस्ट टाकून प्रतिमा मलीन करण्याचा त्याच्यावर आरोप आहे.

गुन्ह्यात वापरलेले ३ इमेल आयडी आणि ट्वीटर खाते तयार करण्यासाठी वापरलेला इंटरनेट प्रोटोकॉल अड्रेस (आयपी अड्रेस) आणि मोबाईल नंबर गुगलकडून पाठीमागील आठवड्यात प्राप्त झाल्यानंतर पवई पोलिसांनी रविवारी त्याच्या एंटोप हिल येथील घरातून त्याला अटक केली.

‘त्याच्या दोन मैत्रिणीसोबत झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी त्याने हे कृत्य केले असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी सांगितले.

मेहताचा दावा नाकारत कार्यालयातील इतर काही लोकांशी वाद असल्याकारणाने त्यांनी माझ्या बदनामीचा कट आखला असण्याची शक्यता आहे, असे तक्रारदार यांनी पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले असल्याचे पवई पोलिसांच्या अधिकाऱ्याने सांगितले. ‘गुन्ह्याच्या स्पष्टतेसाठी आरोपीची प्रेमिका आणि मैत्रिणीचा जवाब सुद्धा आम्ही नोंदवणार आहोत’ असेही याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.

आरोपात कोणतीही तथ्यता नाही. दावा करणाऱ्या तरुणींनी दोन वर्ष काम केले आणि सोडून गेल्याच्या १० महिन्यानंतर ते आरोप करत आहेत. पोस्ट स्वतःला पिडीत म्हणवणाऱ्या तरुणींनी केलेली नाही’ असे एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना बॅनर्जी यांच्या वकिलाने सांगितले.

‘अज्ञात व्यक्तींनी बॅनर्जीविरूद्ध चार खोट्या आणि कल्पित लैंगिक छळाच्या पोस्ट्स केल्या आहेत. हे सर्व त्यांची आणि त्यांच्या कंपनीची प्रतिमा मलीन करण्यासाठी केले जात असून, याची चौकशी करावी. अशी मागणी त्यांनी कोर्टात केल्यानंतर कोर्टाने याबाबत गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले होते’ असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.

भादवि कलम १२० (ब), ४६५, ४६९, ४७१, ५०० सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ सी नुसार गुन्हा नोंद करून तपास सुरु करण्यात आला होता.

‘तपासा दरम्यान मेडियम, सोशल मिडीयावर पोस्ट करण्यासाठी वेगवेगळ्या नावाने बनवलेले ३ इमेल आयडीची माहिती आम्हाला प्राप्त झाली होती. याबाबत गुगलकडून माहिती मागवली असता वापरकर्त्याचा आयपी अड्रेस आणि मोबाईल नंबर गुगलकडून मिळून आला होता. ज्याच्या आधारावर तांत्रिक माहिती मिळवत सबळ पुराव्यांच्या आधारावर आरोपीला अटक करण्यात आली आहे’ असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कोळपे यांनी सांगितले.

कारवाईस थोडा उशीर तपासाला लांबवणारा ठरला असता. ‘अटक आरोपीची मुंबईतून बाहेर बदली झाली आहे. रविवारी बदलीच्या ठिकाणी जाण्यास निघण्याच्या तयारीत असतानाच त्याला अटक करण्यात आली,’ असे पोलिसांनी सांगितले.

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!