नेपाळी सुरक्षारक्षकांच्या टोळीची पवईत ५६ लाखाची चोरी

इमारतीच्या सुरक्षेसाठी ठेवलेल्या नेपाळी सुरक्षारक्षकांनी आपल्या साथीदारांसोबत मिळून फ्लॅटमध्ये घुसून मौल्यवान वस्तूंवर हात साफ करत ५६ लाखाची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी पवई परिसरात घडला आहे. घरातील मंडळी सुट्टीसाठी परदेशी गेल्याचा फायदा घेत चोरटयांनी आपला डाव साधला आहे. याप्रकरणात पवई पोलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा नोंद करून सुरक्षारक्षकांचा शोध सुरु केला आहे.

कुर्ला येथील एलबीएस मार्गावर ऑटोमोबाईल स्पेअरपार्ट बनवण्याचा व्यवसाय असणाऱ्या विकास कुसरकर हे पत्नी आणि दोन मुले ह्या आपल्या परिवारासोबत पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माऊंट व्हिव अपार्टमेंट भवानीनगर येथे राहतात. १ नोव्हेंबरला ते आपल्या परिवारासह ८ दिवसांसाठी दुबई येथे सुट्टीनिमित्त गेले होते.

मी सकाळी घरी असताना माझ्या भाचीचा मला दुबई येथून फोन आला. तिने मला त्यांच्या घरात चोरी झाली असल्याची माहिती त्यांच्या ड्राइवर अखिल खान याने फोन करून त्यांना कळवल्याचे सांगितले. ती रडू लागली तेव्हा तिला समजावत मी त्वरित घरी जाऊन खात्री करतो असे सांगून त्यांच्या घरी पोहचलो. असे पोलीस जवाबात तक्रारदार केतन सावंत यांनी म्हटले आहे.

“आम्हाला स्थानिक रहिवाशांनी माऊंट व्हिव अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक ५ – ६ मध्ये चोरी झाली असल्याची माहिती दिली होती. आमच्या पथकाने तिथे जाऊन पाहिले असता फ्लॅटचा सेफ्टी दरवाज्याची लोखंडी जाळी वाकवून, दरवाजाच्या लॅच आणि आसपासचा भाग तोडून चोरटयांनी घरात प्रवेश केला होता. बेडरूममधील दरवाजांचे सुद्धा लॅच तोडून घरातील लाकडी कपाटात असणारे लोखंडी लॉकर तोडून घरातील मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला होता,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

मी घरी पोहचलो तेव्हा घराचे आणि बेडरूमच्या दरवाजांचे लॅच उचकटून चोरटयांनी घरात प्रवेश करून बेडरूममधील कपाटातील कपडे आणि सामान फरशीवर अस्ताव्यस्त पडले होते. कपाटाचे कप्पे आणि लॉकर तोडल्याने घरात चोरी झाली असल्याची खात्री होताच मी बहीण आणि भावजी यांना व्हिडीओ कॉल करून परिस्थिती दाखवली असता घरातील अंदाजे २ किलो वजनाचे सोन्या-हिऱ्याचे दागिने (अंदाजे किंमत ५० लाख) आणि रोख रक्कम रुपये ६ लाख असा अंदाजे ५६ लाखाचा ऐवज चोरटयांनी लांबवला असल्याचे सांगितले, असेही सावंत यांनी पोलीस जवाबात म्हटले आहे.

कुसरकर यांचा ड्रायव्हर खान नियमित प्रमाणे सकाळी ८.३० वाजता आपल्या कामावर येऊन गाडी धुण्याचे काम करत असताना इमारतीचा लॉंड्री बॉय मिठू याने त्याला ‘आपके मालकीण के फ्लॅट का दरवाजा बुरी तरहसे टूटा हुवा हैं, शायद चोरी हुवा हैं’ असे सांगितले. त्याने धावत तिथे जाऊन पाहिले असता घराचा दरवाजा तुटल्याचे मिळून आल्याने त्याने कुसरकर यांच्या मुलीला फोन करून याची माहिती दिली होती.

“आम्ही इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता इमारतीत सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे २ सुरक्षारक्षक आपल्या इतर दोन साथीदारांसह २ वाजण्याच्या सुमारास इमारतीत प्रवेश करताना तर ३.४५ वाजण्याच्या सुमारास बॅगसह बाहेर येताना आढळून येत आहेत. घटनेनंतर ते चौघेही बेपत्ता आहेत” असे याबाबत बोलताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

याप्रकरणात पवई पोलिसांनी भादंवि कलम ४५७ (रात्रीच्या वेळी केलेली घरफोडी), ३८० (राहत्या घरामध्ये चोरी), ३४ (समान हेतू साध्य करण्यासाठी अनेक व्यक्तींनी केलेले कार्य) नुसार गुन्हा नोंद करून सुरक्षारक्षकांचा शोध सुरु केला आहे.

, , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!