आयआयटी येथील मारुती मंदिर सात दिवसात हटवण्याची पालिकेची नोटीस

मंदिर भक्तगण व स्थानिक नागरिकांची आज (शनिवार, ८ एप्रिल) संध्याकाळी ७ वाजता, मुक्तेश्वर आश्रम येथे या विषयावर चर्चा करण्यासाठी मिटिंग आयोजित केली गेली आहे. राजकीय पक्षांची धोरणे बाजूला ठेवून पवईकर म्हणून जास्तीत जास्त लोकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन मंदिर भक्तगण मंडळींनी केले आहे.

दि शंकराचार्य मार्गावर (जोगेश्वरी – विक्रोळी लिंक) ९२ वर्षापासून उभ्या असणाऱ्या मारुती (हनुमान) मंदिराला पिटीशन फॉर लिव्ह टू सिव्हीलच्या सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयाचा व महाराष्ट्र शासनाचा ०४.१०.२०१० रोजी अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याच्या पारित करण्यात आलेल्या आदेशाचा हवाला देत पालिकेच्या एस विभाग सहाय्यक आयुक्त कार्यालयातून गुरुवारी (०६ एप्रिल २०१७) मंदिर प्रशासनाला ७ दिवसाच्या आत हनुमान मंदिर काढण्यात यावे, अन्यथा सदर मंदिरावर निष्कासनाची कारवाई करण्यात येईल अशा आशयाची नोटीस बजावली आहे. यामुळे पवईमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिर भक्त मंडळांकडून मंदिर हटवण्यास पूर्ण विरोध होत आहे. वेळ पडल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा सुद्धा त्यांच्याकडून देण्यात आला आहे.

‘मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या पिटीशन फॉर लिव्ह टू सिव्हील अपील क्रमांक ८५१९२/२००६ या प्रकरणात दिनांक २९.०९.२००९ पूर्वी अस्तित्वात असलेल्या धार्मिक स्थळावर कार्यवाही करण्याचे न्यायालयाने शासनास आदेश दिले आहे. सदर आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने सीटीएम -९०९/प्र.क्र. ५५८(भाग क्र. २७/विशा -१ ब दिनांक ०४.१०.२०१० अन्वये अनधिकृत धार्मिक स्थळावर निष्कासन कार्यवाही करण्याबाबत निर्णय पारित केलेला आहे. सदर आदेशानुसार या विभागाच्या पत्र क्र. सआएस/ओडी/१८२९/सअ (परि.) दि. २८.०२.२०११ अन्वये आदि शंकराचार्य मार्ग, भवानी पेट्रोलपंप जवळील हनुमान मंदिरास नोटीस देण्यात आली होती. सदर नोटीसद्वारा आपणास मंदिर काढण्याबाबत सूचित करण्यात आले होते. परंतु अद्यापही आपणामार्फत सदर मंदिर आदि शंकराचार्य मार्गावरून काढण्यात आलेले नाही. आपणास या पत्रान्वये सूचित करण्यात येते कि, ०७ दिवसात सदर रस्त्यावरील हनुमान मंदिर काढण्यात यावे अन्यथा या विभागामार्फत सदर मंदिरावर निष्कासनाची कार्यवाही करण्यात येईल.’ अशा मजकुराची नोटीस हनुमान मंदिर सोसायटी अध्यक्ष / सचिव यांना देण्यात आली आहे.

या नोटीसीमुळे संपूर्ण पवईत वातावरण चांगलेच तापले आहे. ‘हे सिद्द, नवसाचे मारुती मंदिर आहे, याला हटवले गेल्यास संपूर्ण पवईवर संकट ओढावेल, त्यामुळे याला हटवण्यास आमचा विरोध आहे.’ असे भक्तमंडळाचे म्हणणे आहे.

मंदिर प्रशासनाला आवर्तन पवईने याबाबत संपर्क केला असता अशी नोटीस मिळाले असल्याचे त्यांनी कबूल केले.

याबाबत बोलणारा प्रत्येक भक्त हा मधुकर राऊत यांचेच उदाहरण देत आहे. यापूर्वी सुद्धा मंदिर हलवण्याचा प्रयत्न झाला होता. नवीन ठिकाणी मंदिर बांधण्याचे काम पाहणाऱ्या राऊत यांचा त्या वेळी दुसऱ्या एका इमारतीचे काम सुरु असताना तिसऱ्या माळ्यावरून पडून कसा अचानक मृत्यू झाला याची कहाणीच प्रत्येकजण सांगत आहे. तसेच एका विकासकालाही आपले वडील याच प्रकरणात गमवावे लागले होते याचे उदाहरणही भक्त देत आहेत.

रस्त्याच्या मधोमध हे मंदिर उभे असल्याने वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण होतो. तसेच हे मंदिर अनधिकृत घोषित केले गेले आहे, त्यामुळे त्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. असे यावेळी बोलताना पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न-करण्याच्या अटीवर सांगितले.

“मंदिर हे १९२५ पासून इथे आहे, त्यावेळी मंदिर हे रस्त्यावर नव्हते. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड आता बनला आहे. आमचा हा रोड बनवताना सुद्धा मंदिर हटवायला विरोध होता आणि आताही आहे. वाहतूक कोंडीची एवढी समस्या जाणवत असेल तर मंदिराच्या वरून एक फ्लायओव्हर बनवावा आणि वाहतूक कोंडी कमी करावी आम्ही मंदिर हलवू देणार नाही.” असेही याबाबत बोलताना समस्त भक्त मंडळींकडून सांगण्यात येत आहे.

, , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!