मेट्रो ६ आणि मेट्रो ४ प्रकल्पामुळे उद्भवणाऱ्या समस्यांसाठी लोकसंवादचे आयोजन

मुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या मुंबई लोकलवर वाढता दबाव आणि मुंबईला नवीन पर्यायी वाहतूक व्यवस्था असावी म्हणून मुंबई मेट्रोचे जाळे मुंबईसह आसपासच्या परिसरात पसरवले जात आहे. हे जाळे पसरवत असताना मेट्रोच्या कामामुळे अनेक ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत. मुंबई मेट्रो प्रकल्प ४ आणि ६ यांच्या निर्मितीवेळी नागरिकांना नेमक्या कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यावर काय उपाय योजना करता येतील याबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी आयआयटी पवई येथील जैन मंदिर हॉलमध्ये लोकसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी स्थानिक खासदार मनोज कोटक, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) अधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ‘एस’ आणि ‘टी’ वॉर्ड सहाय्यक आयुक्त, पवई, भांडूप, मुलुंड, पार्कसाईट पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सर्व स्थानिक नगरसेवकांसह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

लोकसंवादाचे हे पहिले सत्र होते, यात मुंबई मेट्रो प्रकल्पामुळे मेट्रो-६ (स्वामी समर्थनगर – विक्रोळी) आणि मेट्रो ४ (वडाळा ते कासारवडवली – घोडबंदर रोड) या मार्गावर मेट्रोचे काम सुरु असताना नागरिकांना होणाऱ्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी नागरिकांनी प्रकाश व्यवस्थेची कमी, वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग या समस्यांवर प्रकाश टाकला.

प्रकाश व्यवस्थेची कमी

मुंबई मेट्रो प्रकल्प सुरु झाल्यापासून परिसरात पथदिवे नाहीसे झाले असून, प्रकाश व्यवस्था कमी आहे त्यामुळे अंधार असतो. त्यामुळे प्रवाशांना त्रास होतो अशा प्रकारची तक्रार नागरिकांकडून करण्यात आली होती. यावर एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी उत्तर देताना मेट्रोचे काम हे डीवायडरवर सुरु आहे. पथदिवे हे अनेक ठिकाणी डीवायडरच होते कामामुळे ते हटवण्यात आले आहेत. मात्र पर्यायी उपाययोजना करण्यात आल्या आहेत, तरीही पाहणी करून आम्ही योग्य ती खबरदारी घेवू असे सांगण्यात आले.

वाहतूक कोंडी

मेट्रोच्या कामासाठी केलेल्या बेरीकेडींगमुळे आधीच वाहतूक कोंडी असणाऱ्या जेव्हीएलआर सारख्या रस्त्यावर दोन लेन उरल्या आहेत. अजून काम सुरु नाही त्यामुळे बेरीकेडींग करणे आवश्यक आहे का? उरलेल्या लेनमधील सर्विस रोडवर बसेस, रिक्षा पार्क केल्या जात आहेत. जेव्हीएलवर निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीचा फुगा हिरानंदानी, चांदिवली, आयआयटी भागात पोहचल्याने आतील भागात सुद्धा वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. रस्त्याला पडलेल्या खड्यांमुळे वाहतूक धीमी होऊन सुद्धा वाहतूक कोंडी होत आहे. अशा प्रकारच्या समस्या नागरिकांनी वाहतूक कोंडीच्या समस्यांबाबत मांडल्या. याबाबत पालिकेला त्यांच्या रिकाम्या जागा हेरून तिथे पार्किंगची व्यवस्था करत मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलिसांना वाहतूक कोंडी निर्माण करणाऱ्या आणि अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश कोटक यांच्यातर्फे देण्यात आले आहेत.

मिसिंग फुटपाथ / तुटलेले फुटपाथ

मेट्रोचे काम सुरु असणाऱ्या भागात अनेक ठिकाणी फुटपाथ तुटलेले आहेत किंवा गायब आहेत. यामुळे नागरिकांना चालायला जागा नाहीत. प्रकाश व्यवस्था कमकुवत असल्यामुळे अपघात घडू शकतात. जेष्ठ नागरिकांना याचा त्रास होतो अशा समस्या नागरिकांनी याबाबत मांडल्या. यावर उत्तर देताना कोटक यांनी पालिकेला तुम्ही निविदा मागवा, अनुमती मिळवा अशा गोष्टीत वेळ घालवत बसण्यापेक्षा वॉरफुटिंगवर काम करा आणि ही समस्या लवकरात लवकर मिटवा असे आदेश दिले आहेत.

सोमवार पासून एमएमआरडीए, पालिका, लोकप्रतिनिधी यांनी लोकांनी मांडलेल्या समस्या ज्या ज्या भागात आहेत त्याची पाहणी करून, त्याचा अहवाल सादर करत त्याच्यावर उपाययोजना सुरु कराव्यात असे निर्देश सुद्धा कोटक यांनी यावेळी दिले आहेत.

काही नागरिकांनी मात्र हा लोकसंवाद फक्त सोपस्कार होता असे म्हटले आहे. यावेळी मेट्रोच्या समस्येबाबत काहीच चर्चा करण्यात आली नाही. पालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या समस्या मांडण्यात आल्या. एमएमआरडीएने दाखवलेले प्रेजेंटेशन स्पष्ट नव्हते. पाठीमागे बसलेल्या लोकांना काहीच दिसत नव्हते. दाखवत असणाऱ्या गोष्टींचे वर्णन नव्हते. सर्व ढोबळ कामकाज होते असे मुंबई मेट्रो ६ प्रकल्प भूमिगत व्हावा अशी मागणी करणाऱ्या नागरिकांच्या प्रतिनिधी श्रीमती उषा जोशी आणि विवीअन चौधरी म्हणाल्या.

ते पुढे म्हणाले “मुळात लोकांनी मांडलेल्या समस्या निर्माण होऊ नयेत म्हणूनच आम्ही भूमिगत मेट्रोची मागणी करत आहोत. आमची मागणी मान्य झाली तर यातील समस्या नक्कीच कमी होतील.”

लोकसंवादातून मिळालेल्या समस्यांवर काम होताच पुढील समस्यांसाठी पुन्हा लोकसंवाद आयोजित करण्यात येईल. लोकसंवादातूनच कामे पटपट होतात, त्यामुळे नागरिकांच्या विचारातून मेट्रोची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असेही यावेळी कोटक म्हणाले.

लोकसंवादमध्ये मेट्रो ४ प्रकल्पावर सर्वाधिक मुद्दे मांडण्यात आले होते. मेट्रो ६ प्रकल्पावर अधिकारी बोलणे टाळत होते. अनेक प्रश्नांची त्यांनी उत्तरे देणे टाळले आहे. स्थानकांची जागा दाखवताना सुद्धा गोंधळ निर्माण केला, ज्यामुळे मेट्रो ६ प्रकल्पाबाबत जाणून घेण्यास इच्छुक नागरिकांना आपल्या शंका समजू शकल्या नाहीत. त्यामुळे मेट्रो ६ प्रकल्प कसा असेल हे लोकांना समजून सांगून त्यातील अडचणी जाणून घेण्यासाठी लोकसंवाद ठेवावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मेट्रो प्रकल्पात काही लोकांचा स्वार्थ साधण्यासाठी मेट्रो स्टेशन हलवण्यात आल्याचा आरोपही नागरिकांकडून होत आहे.

एमएमआरडीएने मात्र आम्ही दोन्ही प्रोजेक्ट बाबत सविस्तर माहिती दाखवली होती. त्यावरच लोकांनी समस्या मांडल्या आहेत. मेट्रो ६ प्रकल्पाची सुरुवातच आहे, अजून लोकांसोबत आम्ही वेळोवेळी संवाद साधण्याचा प्रयत्न करू. लोकांच्या सूचनांना आम्ही नक्कीच विचार करू. असे याबाबत बोलताना सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!