अनैतिक संबंधातून ५ वर्षाच्या मुलाची हत्या करून मध्यप्रदेशातून पळून आलेल्या आरोपीला पवई पोलिसांनी घातल्या बेड्या

अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या वादातून प्रेमिकेच्या पाच वर्षाच्या मुलाची निर्घुण हत्या करुन, मध्यप्रदेशातून पळून आलेल्या आरोपीस पवई पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या बळावर अटक केली आहे. संजीव पांडे (वय ३६ वर्ष, रा. जिल्हा रिवा, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुरुवारी त्याला अटक करून मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

पांडे याचे आपल्याच परिसरात राहणाऱ्या एका महिलेबरोबर अनैतिक संबंध होते. तिला पाच वर्षाचा मुलगा होता. ज्याच्यावरून त्यांच्यात सतत वाद होत असत. या वादातून रागाच्या भरात पांडे याने या मुलाची हत्या करून मुंबईला पळ काढला होता.

याचा तपास करणारे मध्यप्रदेश येथील विश्व विद्यालय पोलीस ठाण्याचे एक पथक गुरुवारी मुंबईत आले होते. ‘आरोपी पांडे याचे मुंबईतील डी एन नगर, अंधेरी आणि त्याचा भाचा शुभम सोबतचे तुंगागाव पवई येथे टॉवर लोकेशन दाखवत असल्याची माहिती त्या पथकाने पवई पोलिसांना देत तपासात मदत मागितली होती’, असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीच्या आधारावर पवई पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विनोद लाड आणि पथक यांनी आरोपी आणि त्याच्या भाच्याचे नवीन सीडीआर प्राप्त करुन, त्या आधारे तांत्रिक तपासाच्या बळावर गुरुवारी रात्री पावणे बारा वाजता अंधेरीमधील डी एननगर, गिलबर्ट हिल रोड येथील पंचम सोसायटीतून पांडे याला ताब्यात घेतले.

सदर बाबत मध्यप्रदेश येथे भादवि कलम ३०२ अन्वये गु.र.क्र. ६३/१९ नुसार गुन्हा दाखल असून, तांत्रिक गोष्टींची पूर्तता करून त्याला मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

, , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!