जेव्हीएलआरवर प्रसादाच्या तेलावरून गाड्या घसरल्या

जोगेश्वरी – विक्रोळी लिंकरोड़वर (जेव्हीएलआर) आयआयटी मेनगेट, बाटा शोरूमजवळ पडलेल्या तेलावरून घसरून अनेक मोटारसायकल चालक जखमी झाल्याची घटना आज सकाळी पवई परिसरात घडली. वाहतूक पोलिसांनी मोटारसायकल चालकांसाठी मार्ग बदलून आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन माती टाकून दुपारनंतर परिस्थिती नियंत्रणात आणली.

याबाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १२ नंतर जेव्हीएलवरून जाणाऱ्या मोटारसायकल पैकी एक गाडी आयआयटी बिटचौकी पासून काही अंतरावर घसरून पडली.  त्याला उचलण्यात आले असेलच कि नाही, येथील बाटा शोरूमजवळ रोडवरून चालणाऱ्या मोटारसायकली एकापाठोपाठ एक करून घसरून पडू लागल्या.

 

मी मेनगेटजवळ कर्तव्य बजावत होतो. तेलवर पाणी पडल्याने निसरडा झालेल्या रस्त्यावरून गाड्या घसरत असल्याची माहिती मिळताच मी तिथे धाव घेऊन मोटारसायकल चालकांना रस्त्यावर ऑईल पडले असून, अंतर्गत मार्गाचा वापर करण्याच्या सूचना केल्या,’ असे याबाबत सांगताना साकीनाका वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार देशमुख यांनी सांगितले.

विक्रोळी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावर माती टाकून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतरही मोटारसायकल घसरत असल्याने बराच काळ मोटारसायकल वाहतूक अंतर्गत रस्त्याने वळवण्यात आली होती.

याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, काल अकरा दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी जाणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून येथील विविध संस्थाकडून पुरीभाजी, खिचडी, बिस्कीट सारख्या पदार्थांचे वाटप करण्यात येत होते. मंडळांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून गाडीतून जाणाऱ्या लोकांना प्रसाद देत असताना काहीवेळा प्रसाद खाली सुद्धा पडला होता. त्यातच काही भाविकांनी प्रसाद खाऊन मोकळे द्रोण रस्त्यावर तसेच फेकून दिल्याने यातील तेल रस्त्यावर पडलेले होते.

सकाळी किरकोळ पाऊस झाल्याने पडलेल्या प्रसादाचे कण आणि तेल येथील रस्त्यावर पसरल्याने रस्ता घसरडा झाला होता आणि त्यामुळेच वाहने येथून घसरून पडली.

याबाबत माहिती मिळताच वाहतूक पोलिसांच्या एका पथकासह काही स्थानिक दुकानदार आणि नागरिकांनी रस्त्यावर धाव घेत रस्त्यावर वाहतूक नियंत्रणात मदत केली.

‘धोका अजून टळला नसून, अजूनही काही काही भागात रोड निसरडाच आहे. त्यामुळे रात्री येथून प्रवास करणाऱ्या वाहनांनी भरधाव वाहन न-चालवता काळजीपूर्वक चालावे. गेल्या आठवड्यात याच भागात मोटारसायकल घसरल्याने कल्याण येथील एका तरुणाला जीव गमवावा लागला होता. असे याबाबत बोलताना वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes