पवईत कारचालक महिलेची नाकाबंदीमध्ये पोलिसांना धक्का बुक्की

वई, हिरांनंदानी येथे नाकाबंदी सुरु असताना ‘नो एन्ट्री’मधून आलेली कार थांबवून, नियम मोडल्याबाबत दंड भरण्याची मागणी करणाऱ्या पवई पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस शिपायाला कारचालक महिलेने धक्काबुक्की करून पळ काढल्याची घटना बुधवारी संध्याकाळी घडली. याबाबत पवई पोलिसांनी गुन्हा दाखल करून महिलेचा शोध सुरु केला आहे.

पवई पोलिसांच्यावतीने ठिकठिकाणी नाकाबंदी करून पवईमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्या सोबतच गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यात येतो. बुधवारी सुद्धा हिरानंदानी येथील सेन्ट्रल स्ट्रीटवर सायप्रेस इमारती जवळ नियमित नाकाबंदी सुरु होती. “येथील नो एन्ट्री भागातून लाल रंगाची ह्युंडाई एक्सेंट कार क्रमांक एमएच ०१ जिए ६६४४ येताना पाहून कर्तव्यावर असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनी तिला थांबण्याचा इशारा केला. सदर कार ही महिला चालक चालवत असल्याने कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलिस शिपायाने वाहनचालक महिलेस नियम मोडल्याबद्दल दंड भरण्याची सूचना केली.” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांच्या अधिकाऱ्याने सांगितले.

ते पुढे म्हणाले “कारचालक महिलेने गुन्हा मान्य न-करतानाच महिला पोलिस शिपायाशी बाचाबाची करत अरेरावी करायला सुरूवात केली. मात्र पोलिस अधिकाऱ्याने दंड भरण्याची मागणी करताच महिला पोलिस शिपायाला रागाने धक्का मारून, अपमानात्मक भाष्य करत कारचा दरवाजा लावून, कार चालक महिलेने तेथून पळ काढला.”

याबाबत पवई पोलिसांनी भादवि कलम ३५३ (लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने प्रारुत्त करण्यासाठी फौजदारी पात्र बलप्रयोग करणे) नुसार गुन्हा नोंद करून कार क्रमांकाच्या सहाय्याने कारचालक महिलेचा शोध सुरु केला आहे.

याबाबत बातमी जाण्यापूर्वी हाती लागलेल्या माहितीनुसार सदर महिला हिरानंदानी येथील गलेरिया शॉपिंग मॉलजवळ असणाऱ्या एका इमारतीत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, पोलीस याठिकाणी त्या महिलेचा शोध घेत आहेत.

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!