मेट्रो – ६ भूमिगत मार्गाने करण्याची पवईकरांची मागणी

स्वामी समर्थनगर – जोगेश्वरी – कांजुरमार्ग – विक्रोळी या मार्गावर होणारा मेट्रो – ६ प्रकल्प भूमिगत करण्याची मागणी पवईकरांकडून केली जात आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोड़वर होणाऱ्या वाहतूक कोंडीसह हा एलिवेटेड मार्ग पवई तलाव आणि परिसराचे सौदर्य बिघडवणार असल्याने, पवईकरांनी याला विरोध दर्शवत भूमिगत मार्गाने करण्याची मागणी केली आहे. पवईकरांमध्ये याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि वृत्तपत्रांमधून पत्रके वाटून ‘अग्नी’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे जनजागृती उपक्रम राबवला जात आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींना सुद्धा मागणीचे पत्र देण्यात आले असून, मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे प्रयत्न सुद्धा सुरु आहेत.

मुंबईच्या काही प्रमुख ठिकाणांपैकी एक पवईला गणले जाते. आयआयटी, इन्स्टिट्यूट, मरिन इन्स्टिटयूट, पवई तलाव, हिरानंदानी असे एक-ना-अनेक कारणांनी या ठिकाणाला अन्यय साधारण महत्व आहे. त्यातच या परिसराचा वाढता विकास पाहता गेल्या दशकात आदी शंकराचार्य मार्गाचे जोगेश्वरी – विक्रोळी लिंकरोडमध्ये रूपांतर झाल्याने पूर्व आणि पश्चिम उपनगरे एकमेकांच्या खूपच जवळ आली आहेत.

वर्सोवा-घाटकोपर या पहिल्या मेट्रोच्या यशानंतर मुंबईत मेट्रोचे जाळे पसरायला लागले आहे. याच जाळ्यातील एक भाग म्हणजे मुंबई मेट्रो प्रकल्प ६ जो पवईतून जाणार आहे. यामुळे येथे राहणाऱ्या लोकांना खूप मोठा फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, हा मेट्रो ६ प्रकल्प पवईच्या विकासाचा, सुविधांचा नसून नुकसानीचा आहे. यामुळे सुंदर पवईची दुर्दशा होऊ शकते असे म्हणत पवईकरांनी याला विरोध दर्शवत पवईचे सौदर्य न-बिघडवता भूमिगत मार्गाने मेट्रो – ६ प्रकल्प राबवावा अशी मागणी स्थानिकांतर्फे केली जात आहे.

एलिवेटेड मार्ग पवई तलावाचा काही भाग व्यापण्याची अपेक्षा आहे, जे पर्यावरणास हानीकारक आणि वाहतूक कोंडीस कारण होऊ शकते. जे पाहता जेव्हीएलआर मार्गावर राहणारे रहिवासी भूमिगत मेट्रोची मागणी करत आहेत. १४ किलोमीटरचा हा प्रकल्प लोखंडवाला जंक्शन येथील स्वामी समर्थनगर येथून विक्रोळी येथे पूर्व दृतगती (ईस्टर्न एक्सप्रेस हायवे) मार्गाला जोडेल. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) द्वारे हा प्रकल्प बनवला जात आहे.

भूमिगत मार्गासाठी रहिवाशांनी फेसबुक आणि ट्विटर या सोशल मीडियाच्या माध्यमातून मोहीम सुरू केली आहे. सोबतच या भागात वृत्तपत्रातून पत्रके सुद्धा वाटून जनजागृती राबवली जात आहे. या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याचा प्रयत्न सुद्धा करीत आहेत.

पवईतील हिरानंदानी येथे झालेल्या अनेक बैठकीनंतर येथील ८ सप्टेंबर रोजी इव्हिटा इमारतीत झालेल्या बैठकीत प्रसिद्ध आर्किटेक्ट नितीन किल्लावाला यांनी मेट्रो प्रकल्पाचे धोके आणि तोटे मांडले.

किल्लावाला यांनी या मार्गावर जवळपास ५० वळणे आहेत आणि मेट्रोला सुद्धा यासाठी वळणे असणारा मार्ग बनवणे आवश्यक असल्याचे निदर्शन आणून दिले.

जेव्हीएलआरवर चार स्टेशन आहेत, त्यापैकी तीन पवई तलावाजवळ आहेत ज्यांच्या बांधकामासाठी पवई तलावाचा भाग व्यापला जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत करोडो रुपये खर्च करून या भागात सौदर्यकरण केले गेले आहे, ते या मार्गामुळे बिघडले जाणार असल्याने याला विरोध दर्शविताना स्थानिकांनी सांगितले.

“याच मार्गासाठी सुमारे ३८ एकर जमीन अजूनही आरक्षित आहे. म्हणूनच मेट्रो ६ भूमिगत बनविण्यासाठी अद्याप फार उशीर झालेला नाही. साकीविहार रोड, चांदीवली, हिरानंदानी कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील मार्गे कांजुरमार्ग यार्डपर्यंत मरोळ नाका मेट्रो लाइन ३ सोबत जोडत हा प्रकल्प राबवला जाऊ शकतो. यामुळे पवई तलावाला एलिव्हेटेड मेट्रोच्या बांधकामापासून दूर ठेवता येईल. कोलाबा आणि कांजुरमार्गला जोडून कोलाबा आणि दहिसर यांना जोडण्यासाठी हरवलेली संधी पुन्हा मिळू शकते, असेही किल्लावाला यांनी पूर्वी झालेल्या बैठकीत मुद्दा मांडला होता.

सप्टेंबरमध्ये मेट्रोच्या विरोधात पवईकरांच्यावतीने रहिवाशी प्रतिनिधींनी खासदार पूनम महाजन यांची भेट घेतली होती. महाजन यांच्या समोर होणाऱ्या दुष्परिणामांचे सादरीकरण करतानाच एलिव्हेटेड ऐवजी भुयारी मार्गे (भूमिगत) प्रकल्प राबवण्यात यावा अशी मागणी या प्रतिनिधींच्यातर्फ करण्यात आली.

या बाबत माध्यमाशी बोलताना भूमिगत मेट्रो निवडल्यास प्रकल्पातील खर्चाच्या वाढीचा उल्लेख करताना, ‘भूमिगत मेट्रोचा खर्च एलिव्हेटेड मेट्रोपेक्षा तीनपट जास्त आहे.’ असे एमआरआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मेट्रो – ६ प्रकल्पाच्या कामासाठी आम्ही अगोदरच बॅरिकेटिंग केले आहे, असेही ते पुढे म्हणाले.

मेट्रो प्रकल्पाला होणार हा पहिलाच विरोध नाही, पश्चिम उपनगरातील रहिवासी देखील मेट्रो-२ बी (डीएननगर ते मंडले) भूमिगत मार्गाची मागणी करत आहेत. मेट्रो – ३ (कोलाबा-बांद्रा-सिपझ्) हे शहरातील एकमात्र पूर्णपणे भूमिगत मेट्रो आहे.

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes