संघर्षनगर, चांदिवली कंटेन्मेंट झोन; व्यवहार आणि संचारास निर्बंध

चांदिवली कंटेन्मेंट झोनचांदिवली संघर्षनगर येथील वाढत्या बाधितांच्या संख्येला आळा घालण्यासाठी पालिकेने आता मोठे पाऊल उचलले असून, संघर्षनगर, चांदिवली हा विभाग कंटेन्मेंट झोन/ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. सोमवार ८ जून २०२० पासून ते २१ जून २०२० पर्यंत  हा आदेश लागू करण्यात आला आहे. या काळात व्यवहार आणि संचारास निर्बंध घालण्यात आले आहेत.

देशासह महाराष्ट्रात आणि मुंबईत कोरोना विषाणूंने थैमान घातला आहे. एकट्या मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत ४७३५४ बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईत विविध विभागात वाढत्या कोरोना संकटाला रोखण्यासाठी पालिकेतर्फे आणि आरोग्य यंत्रणेकडून आवश्यक त्या योग्य खबरदाऱ्या घेतल्या जात आहेत. पालिका ‘एल’ विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या संघर्षनगर, चांदिवली विभागात सुद्धा मोठ्या प्रमाणात बाधित मिळून आलेले आहेत. तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणात लोकांचे स्थलांतर करण्यात आलेल्या या परिसरात राहणारी मोठी लोकवस्ती लक्षात घेता पालिकेतर्फे कोरोनाचा प्रसार या परिसरात रोखण्यासाठी या विभागाला कंटेन्मेंट झोन/ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

जाहीर सूचना

पालिका एल विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्यावतीने एक जाहीर सुचनापत्रक काढून याची माहिती देण्यात आली आहे. या जाहीर सुचना पत्रकानुसार, “मी, श्री मनिष रा. वळंजु, सहाय्यक आयुक्त एल विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, शासन निर्णय क्रमांक कोरोना/२०२०/सीआर/५८ आरोग्य-५ अन्वये, मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा उपयोग करून, सर्व रहिवासी/पोलीस प्रशासन व ज्या कोणाला खालील बाब लागू असेल अशा सर्वाना सूचित करतो कि, संघर्ष नगर, चांदिवली हा विभाग  कंटेन्मेंट झोन/ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत असून या विभागात सोमवार दि. ०८.०६.२०२० रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून पुढील १४ दिवस म्हणजे रविवार दि. २१.०६.२०२० रोजी रात्रौ १२.०० वाजेपर्यंत सर्व व्यवहार व संचारास निर्बंध घालण्यात येत आहेत. वरील नमुद परिसरात आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेशित करण्यात येत आहे.

सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर ‘भारतीय दंड विधान कलम १८८ नुसार’ कडक फौजदारी कारवाई करण्यात येईल.

पालिका एल विभाग सहाय्यक आयुक्त मनिष वळंजु यांच्या सहीनिशी ०६/०६/२०२० रोजी पत्रक काढून ही माहिती देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा: माणसातला देवमाणूस – तीन रुग्णालयांनी नाकारलेल्या गर्भवतीची त्यांनी घरीच केली प्रसूती

या संदर्भात बोलताना सहाय्यक पोलीस आयुक्त, साकीनाका विभाग मिलिंद खेतले यांनी याची पुष्टी करतानाच नियमनाचे कठोर पालन करण्याची सूचना सुद्धा नागरिकांना केली आहे. “पालिकेने आणि पोलिसांनी दिलेल्या सर्व सूचनांचे नागरिकांनी या काळात काटेकोरपणे पालन करावे. एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीत आणि इमारत परिसरात विनाकारण फिरणे टाळावे. ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी आणि पालिका प्रतिनिधी तैनात केले जाणार आहेत आवश्यक असेल तेव्हा त्यांची मदत घ्यावी.”

पालिकेतर्फे परिसराचे सर्व मुख्य प्रवेश सील केला जाणार असून, परिसर कंटेन्मेंट झोन/ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याच्या सूचना फलक सुद्धा तिथे लावले जाणार आहेत. तसेच या परिसरात कोणालाही प्रवेश करण्यास आणि परिसरातून बाहेर जाण्यास प्रतिबंधित केले जाणार आहे (वैद्यकीय अत्यावश्यकता वगळता), असेही याबाबत बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितले.

इनपुट्स: गौरव शर्मा

आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकइन्स्टाग्रामट्विटरयूट्यूबवर फॉलो करू शकता.

, , , , , , , , , ,

2 Responses to संघर्षनगर, चांदिवली कंटेन्मेंट झोन; व्यवहार आणि संचारास निर्बंध

  1. Prasad jalgaonkar June 8, 2020 at 5:34 am #

    Containment zone jahir kela ,changla ahe pan Atta paryant Konalahi hyachi bilkul khabar navti ki hi paristhiti ahe… Ani 2.5 mahinyat kadhi tumchya channel var pan hi news kadhich dakhavli geli nahi..

    • आवर्तन पवई June 8, 2020 at 12:14 pm #

      येथील अधिकृत आकडेवारी पालिकेकडून येत नाही आहे. त्यामुळे आकडेवारी सांगणे शक्य नव्हते. प्रतिबंधित क्षेत्र केल्याचे आदेश (०६ जून २०२०) मिळाल्यानंतर पोलीस आणि पालिका दोघांकडून याबाबत अधिकृत माहिती मिळवत मगच माहिती देण्यात आली आहे.

      माहिती उपलब्ध झाल्यास खातरजमा करून मगच सांगण्यात येते.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!