पवईत कोरोनायोद्धा प्रमाणपत्रांचे पेव

विविध संस्थांच्या नावे ‘कोरोनायोद्धा’ प्रमाणपत्र मिळवत हे आपले कौतुक करून घेत आहेत. असे प्रमाणपत्र देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोघांचेही पवई
@अविनाश हजारे – सध्या लॉकडाऊनचे कठोर नियमन सुरू असताना स्वकौतुकाचे डोहाळे लागलेल्यांनी स्वतःची पाठ थोपटवून घेण्यासाठी वेगळीच शक्कल लढवली आहे. विविध संस्थांच्या नावे ‘कोरोनायोद्धा’ सन्मानपत्र मिळवत हे आपले कौतुक करून घेत आहेत. असे सन्मानपत्र देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोघांचेही पवई आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पेव फुटले आहेत.
कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवक, पोलीस, स्वच्छता कर्मचारी, या सर्वाना मदत करणारे कर्मचारी सतत झोकून देऊन काम करत असल्याने त्यांचे सर्वच स्तरांतून कौतुक केले जात आहे. तसेच अनेक जण सामाजिक बांधिकली जपत आपल्या पक्ष, संस्था, संघटनेच्या माध्यमातून गरजवंतांना प्रामाणिकपणे मदत करत आहेत. अशा लोकांचे सन्मान होणं गरजेचेही आहे. परंतु, ज्यांचे कोरोना काळात कशाचेही योगदान नाही अशांनाही काही संस्था, पक्ष चमकोगिरी करत ‘कोरोनायोद्धा’ सन्मानपत्र वाटत असल्याचे निदर्शनास येत आहे.
एवढ्यावरच न थांबता ही सन्मानपत्र समाजमाध्यमांवर टाकून स्वस्तुती करवून घेण्याचा सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड सुरू आहे. फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर करत स्तुतीसुमने उडवून घेण्यासाठी त्यांची चढाओढ सुद्धा लागलेली आहे.
कोणत्याही प्रकारची माहिती न घेता आणि कामाचा आढावा न घेता हे सन्मानपत्र दिले जात आहे. टाळेबंदी दरम्यान त्याच्या सेवेचे, कामाची तपासणी न करता विविध संस्थांकडून सन्मानपत्र दिल्याबद्दल अनेकजण आक्षेप नोंदवित आहेत. हे सन्मानपत्र कुठे मिळते? असा आक्षेप नोंदवणारा ट्रेंड सुद्धा सोशल माध्यमात सध्या सुरु आहे.

हे सुद्धा वाचा: कोरोना काळात पोलिसांना मदत करण्यासाठी पवई पोलिसांतर्फे ‘कोविड पोलिस’ नियुक्त

या प्रकरणाची दखल घेत विक्रोळी मतदार संघाचे आमदार सुनिल राऊत यांनी याबाबत नाराजी व्यक्त करताना म्हटले आहे की, “मुंबईत कोरोना बाधित कमी आणि कोरोना योद्धेच जास्त झाले आहेत. जे लॉकडाऊनच्या काळात घराच्या बाहेरही पडले नाहीत त्यांना सुद्धा योद्धा म्हणण्याची नवी फॅशनच सुरू झाली आहे.”
ते पुढे म्हणाले “सन्मानपत्रकाची अशी खैरात केल्यामुळे त्या सन्मानपत्रकांची किंमत तर कमी होत आहेच, परंतु कोरोना काळात ज्यांनी खरोखरच काम केलंय त्यांचे कार्यही झाकोळले जात आहे.”
“चांगले कार्य करणाऱ्या लोकांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देणे ही आपली परंपराच आहे आणि ते झालेच पाहिजे. मात्र समोरच्या व्यक्तीचे कोणतेही कार्य नसताना त्याला सन्मानित करणे कितपत योग्य आहे. बर हे सन्मानपत्रे चिचूके वाटल्याप्रमाणे वाटली जात आहेत. कोणाचा सन्मान करावा आणि कोणाचा नाही याचे भान सुद्धा आता काही संस्थाना राहीलेले नाही. त्यामुळे प्रत्येक गल्ली बोळात एक कोरोना योद्धा दिसू लागलाय,” अशा संतप्त भावनाही काही पवईकरांनी यावर व्यक्त केल्या आहेत.
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.

, , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!