ठाणे ते पवई (हिरानंदानी) बेस्टची प्रीमियम बससेवा पुढच्या आठवड्यापासून

बेस्टच्या प्रीमियम बससेवेला पहिल्या दिवसांपासून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर बेस्ट उपक्रमाने मुंबईतील आणखी ३ मार्गावर ही बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वातानुकूलित प्रीमियम बससेवा ठाणे ते पवई (हिरानंदानी), चेंबूर ते कफ परेड, आणि खारघर ते बीकेसी या तीन मार्गांवर सुरू करण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक, वातानुकूलित प्रीमियम अशी ही बस असणार आहे. ‘चलो मोबाईल’ अॅपद्वारे या बसमधील आसन आरक्षित करता येणार आहे.

या तीन मार्गांवर १० प्रीमियम बस चालवण्याचा निर्णय बेस्टने घेतला होता, मात्र बस न आल्याने ही सेवा सुरू करण्यात आली नव्हती. येणाऱ्या आठवडाभरात या तिन्ही मार्गांवर बेस्टच्या प्रीमियम बस धावतील, अशी माहिती बेस्टकडून देण्यात आली आहे.

मुंबईत कामानिमित्त विविध भागात प्रवासासाठी दररोज लाखोच्या संख्येने प्रवासी बेस्ट बसचा वापर करत असतात. बेस्टमधून प्रवास करणाऱ्या या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी बेस्टकडून विविध उपक्रम राबवले जात असतात.

बेस्ट उपक्रमाचा एक भाग म्हणून बेस्टने १२ डिसेंबरपासून प्रीमियम लक्झरी बस सेवा सुरू केली आहे. पर्यावरणपूरक अशी इलेक्ट्रिक, वातानुकूलित प्रीमियम बस ठाणे ते बीकेसी, वांद्रे स्थानक पूर्व ते बीकेसी या मार्गावर दररोज धावत आहेत. या सेवेला प्रवाशांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. दर अर्ध्या तासाच्या अंतराने धावत असणाऱ्या या बसगाड्यामधून दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत आहेत.

जानेवारी अखेरपर्यंत आणखी प्रीमियम बस ताफ्यात येणार असल्याची माहिती बेस्टकडून देण्यात येत आहे. बेस्ट उपक्रमाने ठाणे, मुंबईसह नवी मुंबईतील प्रवाशांनाही ही सेवा देऊ केली आहे.

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!