मुसळधार : पवई, चांदिवली भागात काय घडले?

काही काळ उघडीप दिलेल्या पावसाचे मुंबईत पुन्हा दमदार आगमन झाले आहे. पाठीमागील चार दिवसांपासून पावसाने मुंबईकरांची चांगलीच धुलाई केली आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे. साकीनाका, चांदीवली, आयआयटी पवई परिसरात अनेक ठिकाणी पाणी भरल्याने, झाडे पडल्याने, जमिनी धसल्याने जनजीवन विस्कळीत झाले. विहार तलाव ओव्हरफ्लो झाल्याने मिठी नदीच्या पाण्यात वाढ होत किनाऱ्यावर असणाऱ्या रहिवाशांना धोका निर्माण झाला आहे. असे अनेक संकटे नागरिकांसमोर उभी ठाकली आहेत, याचा आवर्तन पवईने घेतलेला हा आढावा.


विहार तलाव भरला

मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव ओसंडून वाहू लागला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत असलेला विहार तलाव बुधवारी रात्री ९ वाजून १५ मिनिटांनी पूर्ण भरून वाहू लागला असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली. मुंबई, ठाणे भागात दमदार पाऊस होत असल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव भरून वाहू लागला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी तीन तलाव आधीच भरून वाहू लागले आहेत. ओव्हरफ्लो झालेला विहार तलाव हा चौथा तलाव आहे. पवई तलावाच्या ओव्हरफ्लोनंतर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी सर्वात आधी १२ जुलैला तुळशी तलाव भरून वाहू लागला. पाठोपाठ तीनच दिवसांनंतर १५ जुलै रोजी तानसा धरण भरले. दुसऱ्याच दिवशी मोडकसागरही ओसंडून वाहू लागला.

तलावक्षेत्रात दमदार पाऊस होत असल्याने मुंबईकरांच्या पाण्याची चिंता बऱ्याच अंशी कमी झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वच तलावांत ८५% पेक्षा जास्त प्रमाणात पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्यावर्षी ३१ जुलैपर्यंत तलावांत ८३.३० टक्के इतका पाणीसाठा जमा झाला होता.

तलाव ओव्हरफ्लो होताच तिकडे जाण्यास पर्यटकांची झुंबड उडते. विहार तलावाकडे जाण्याचा मार्ग हा धोकादायक आहे. शिवाय सततच्या मुसळधार पावसामुळे धोकादायक वातावरण असल्याने पर्यटकांनी तिकडे जाणे टाळावे असे आवाहन पालिका आणि मुंबई पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
मिठी नदीची पाण्याची पातळी वाढली, किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

विहार तलाव भागातूनच मिठी नदीचा उगम होतो. तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर वाहणारे पाणी मिठी नदीच्या पात्रात जाते. तर पवई तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर वाहून जाणारे पाणी सुद्धा पुढे जावून मिठी नदीला मिळते. हे दोन्ही तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे आणि सततच्या मुसळधार पावसामुळे मिठी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्यात वाढ झाली आहे. यामुळे या नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या मोरारजी नगर, फिल्टरपाडा, जयभिम नगर, गौतम नगर भागात पाणी घुसले आहे. सततचा पाऊस आणि पाण्याची वाढणारी पातळी लक्षात घेता येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

घरात पाणी घुसल्याने बेहाल झालेल्या नागरिकांना स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख मनिष नायर यांच्याकडून यावेळी जेवणाचे वाटप करण्यात आले.
आरे कॉलनीकडे जाणारा रस्ता बंद

मिठी नदी ओसंडून वाहू लागल्याने मुसळधार पावसाचे पाणी ठिकठिकाणी साठून राहत असल्यामुळे पुढे येणारा धोका लक्षात घेता पवई उद्यानपासून फिल्टरपाडा मार्गे आरे कॉलनीकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. गोरेगाव दिशेने जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांनी जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. पवई पोलिसांनी शनिवारी पवई उद्यान भागात बंदोबस्त लावत आरे कॉलनीकडे जाणारी वाहतूक वळवली.
हिरानंदानी, नहारमध्ये झाडे उन्मळून पडली, ३ गाड्यांचे नुकसान

जोरदार पावसामुळे हिरानंदानी येथील डेफोडील इमारतीजवळ असणारे एक भले मोठे झाड रस्त्यावर पडले. तर इडन मार्केट भागात असणारे एक झाड इथे उभ्या काही गाड्यांवर आणि कंपाऊंडवर पडल्याने कंपाऊंडसह ३ कारचे नुकसान झाले आहे. पालिका एस विभागाला याची माहिती दिल्यानंतर झाड कापून वेगळे करत रस्ता मोकळा करण्यात आला. तर दुसरीकडे चांदिवलीमधील नहार कॉम्प्लेक्समध्ये सुद्धा एक झाड पडल्याची घटना घडली. येथे सुद्धा रस्त्यावर उभी एक कारवर झाड पडल्याने कारचे नुकसान झाले आहे.
चांदिवली, संघर्षनगरमध्ये रस्ता खचला

संघर्षनगर येथील इमारत क्रमांक १० जवळ रस्ता खचल्याच्या घटनेला महिना उलटला नसेल की काल शनिवारी रात्री या भागात इमारत क्रमांक १३ जवळ रस्ता खचून भिंत पडल्याची घटना घडली आहे. या घटनेत रस्त्याच्या किनाऱ्यावर उभ्या असणाऱ्या गाड्या सुद्धा खाली पडल्या आहेत. दोन्ही घटना वसाहतीच्या मुख्य रस्त्यांवर घडल्या असल्यामुळे नागरिकांनी आता कॉम्प्लेक्समध्ये नक्की यायचे जायचे कसे हा प्रश्न रहिवाशांना सतावत आहे.

, , , , , , , , , , , ,

2 Responses to मुसळधार : पवई, चांदिवली भागात काय घडले?

  1. Aakash August 5, 2019 at 3:30 am #

    पवई तलावाच्या ओव्हरफ्लोनंतर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी सर्वात आधी १२ जुलैला तुळशी तलाव भरून वाहू लागला. पाठोपाठ तीनच दिवसांनंतर २५ जुलै रोजी तानसा धरण भरले. दुसऱ्याच दिवशी मोडकसागरही ओसंडून वाहू लागला.
    Read properly….typing mistake

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!