सिमेंट मिक्सरच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गांधीनगर पुलावर गुरुवारी सकाळी ७.१५ वाजता मिक्सर पलटी होऊन दुसऱ्या मार्गिकेवरून जाणाऱ्या इको कारसह, रिक्षा व दुचाकीला त्याने आपले शिकार बनवले. या अपघातात २ लोक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत पार्कसाईट पोलिसांनी निष्काळजीपणे गाडी चालवण्याच्या गुन्ह्यात मिक्सर चालक शंकू कुमार प्रसाद (३५) याला अटक केली आहे. भर रस्त्यात ट्रेलर आडवा झाला असल्याने जवळपास ८ तास पवईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली होती. अखेर क्रेनच्या सहाय्याने ट्रेलरला हटवून दुपारनंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून या अपघातात दुचाकी आणि रिक्षातून प्रवास करणारे वंदना किरत (३५) आणि परशुराम पाटील (५२) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
पवईकडून विक्रोळीच्या दिशेने जाताना गांधीनगर भागात लागणाऱ्या उतारावरून भरधाव वेगात जाणारा सिमेंट मिक्सर गांधीनगर पुलावर चढत असताना चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने तो पलटी झाला आणि दुभाजकाला तोडून रस्त्याच्या दुसऱ्या मार्गिकेवरून जात असणाऱ्या इको कार, रिक्षा व दुचाकीवर जावून आदळला.
प्रत्यक्षदर्शीच्यानुसार हा अपघात एवढा मोठा होता कि, ठोकर लागल्याने दुचाकीवरून प्रवास करणारी महिला वंदना किरत ही पुलावरून खाली पडून गंभीर जखमी झाली. पाटील यांना सुद्धा गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना पवई आणि विक्रोळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिक्सर पलटी होताना चालकाने उडी मारल्याने तो बचावला गेला मात्र क्लीनर जखमी झाला आहे.
अपघातानंतर मिक्सर रस्त्यावरच आडवा पडलेला असल्याने पूर्व द्रुतगती महामार्गावरून पवईच्या दिशेने येणारी वाहतूक जवळपास आठ तास विस्कळीत झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांकडून छोट्या छोट्या प्रमाणात वाहतुकीचे मार्ग खुले करण्यात आले होते. मात्र सकाळपासूनच वाहुतुकीच्या झालेल्या खोळंब्यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांना याचा जबर फटका बसला. दुपारी मोठी क्रेन आल्यावर मिक्सर हटवून मार्गिका मोकळी करण्यात आल्याने मुंबईकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
या प्रकरणी बोलताना पार्कसाईट पोलिसांनी सांगितले “मिक्सर गांधीनगर पुलावर चढत असताना चालक प्रसाद याचा गाडीवरचा ताबा सुटल्याने तो रस्त्याच्या दुसऱ्या मार्गिकेवर जाऊन आदळला. यात २ लोक गंभीर जखमी झाले असून कारसह, रिक्षा, दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निष्काळजीपणे, हयगयने गाडी चालवण्याच्या गुन्ह्यात मिक्सर चालक शंकू कुमार प्रसाद (३५) याला आम्ही अटक करून अधिक तपास करत आहोत.
No comments yet.