सुट्टे पैसे घेण्याच्या बहाण्याने व विविध मार्गाने लोकांना फसवून मुंबईभर हैदोस घालणाऱ्या ठगास, केवळ ४ अंकी गाडी नंबर वरून पकडण्यात पवई पोलिसांना यश मिळाले आहे.
ब्लॅकने गॅस घेण्याच्या बहाण्याने गॅस डिलिवरी करणाऱ्या दोन कामगारांना किंमतीपेक्षा जास्त रक्कम देवून, काही वेळाने त्यांच्याकडूनच सुट्टे पैसे घेण्याच्या बहाण्याने त्यांना ठगणाऱ्या एका ठगास पकडण्यात पवई पोलिसांच्या तपासी अधिकारी समीर मुजावर व पथकाला यश आले आहे. अब्दुल नजीर अब्दुल रफिक खान उर्फ राजा (२५) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून मुंबईतील विविध ठिकाणी अशाच प्रकारे त्याने गुन्हे केले असून, पोलीस त्याचा शोध घेत होते.
पवई परिसरात एचपी गॅसचे डिलिवरी करणारे दोन डिलिवरी बॉय पवईतील मोरारजीनगर भागात गॅसची डिलिवरी करत असताना श्रीमंत असावा असा पेहराव केलेल्या एक युवकाने त्यांच्या जवळ येऊन “मेरा हॉटेल का बिसनेस है, मुझे ब्लॅकसे दो कमर्सिअल गॅस बाटला चाहिये मिलेगा क्या और कितना पैसा लगेगा?” अशी विचारणा केली. डिलिवरी बॉयनी “हां मिलेगा, चोबिसौ रुपये लगेगे” असे त्यास उत्तर देताच त्याने लगेच खिशातून रक्कम काढून किंमतीपेक्षा जास्तच रुपये त्यांना देत त्यांना तो समोरील लोकविहार येथील इमारतीत राहतो असे सांगून तिथे गॅस पोहचवायला सांगितला.
काही वेळातच डिलिवरी बॉय गॅसचे बाटले घेऊन तिथे पोहचले, तेव्हा ती व्यक्ती इमारतीच्या सुरक्षा रक्षकाच्या खुर्चीवर बसलेली त्यांना दिसली. त्याने अमुक अमुक फ्लॅटमध्ये बाटला पोहचवण्यास सांगितले. गॅसचा बाटला गाडीतून उतरवत असतानाच त्याने “मुझे हॉटेल मे कस्टमर्स को देने के लिये छुट्टा पैसा लगता है, आप लोगोंके पास है क्या? मै तुम्हे हजार के नोट देता हूँ” अशी विचारणा केली. गॅसच्या बाटल्यांचे आधीच पैसे मिळालेले असल्याने डिलिवरी बॉयनी सुद्धा विश्वास ठेवून दोघांकडील मिळून तीस हजार रुपयांची रक्कम त्याला दिली. त्यानेही कॉल करून ‘मां दो बाटले उपर भेज रहाँ हूँ उसके पैसे दे दिये है, उनसे मैने तीस हजार छुट्टे लिये है, उनको हजार के नोट दे देना’ म्हणून सांगितले.
जेव्हा डिलिवरी बॉय गॅसचा बाटला घेऊन त्या रूममध्ये गेले, तेव्हा तिथे उपस्थित असणाऱ्या महिलेने आम्ही गॅस मागवलेलाच नाही असे त्यांना सांगितले. त्यांनी ‘अहो तुमच्या मुलाने पाठवला आहे आणि आमच्याकडून सुट्टे पैसेही घेतलेले आहेत’ असे सांगताच त्या महिलेने ‘माझा मुलगा अमेरिकेत आहे तो कुठून पाठवणार? असे उत्तर देताच डिलिवरी बॉयनी खाली येऊन त्या व्यक्तीचा शोध घेतला पण तो गायब होता. याबाबत त्यांनी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
“इमारतीच्या सुरक्षारक्षकास विचारणा केली असता, त्याने आम्ही त्या व्यक्तीस पहिल्यांदाच पाहिले असल्याचे सांगितले. सदर व्यक्तीने तो अमेरिकेत शिकत असून आईकडे आला असल्याचे सुरक्षारक्षकास सांगितले होते. इमारतीत येताना तो काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून आल्याचेही त्याने आम्हास सांगितले. ज्यावरून आम्ही घटनास्थळाचा सीसीटीव्ही तपासला असता आम्हास फसवणाऱ्या व्यक्तीचे फुटेज प्राप्त झाले होते. त्यात थोडासा अस्पष्ट असा व्यक्तीचा चेहरा आणि बाईकचा २५८८ एवढाच नंबर आम्हास मिळून आला होता” असे आवर्तन पवईशी बोलताना तपासी अधिकारी समीर मुजावर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले “आम्ही त्या चार नंबरशी जुळणारे सर्व नंबर मुंबई आरटीओ मधून मागवून, त्यांची छाननी केली असता, त्या वर्णनाशी संपूर्ण जुळणारी गाडी जोगेश्वरी भागातील एका पत्यावर घेण्यात आल्याचे समोर आले. मात्र तपासात नाव आणि पत्ता खोटा निघाला. आरोपीचा फोटो परिसरात दाखवला असता त्यास तेथे कोणीच ओळखत नव्हते. पुन्हा आरटीओच्या मदतीने त्यास आर्थिक मदत देणारी बँक आणि गाडी विकणारी एजेंन्सीचा पत्ता मिळवून तपास सुरु केला. एजेंसी मधून काही माहितीसह एक नंबर हाती लागला होता. तो नंबर वापरात असणाऱ्या व्यक्तीस ताब्यात घेताच, त्याने आरोपीला ओळखून त्याचे नाव अब्दुल नजीर अब्दुल रफिक खान उर्फ राजा असे असल्याचे सांगितले. आरोपी हा गोरेगाव येथील म्हाडा वसाहतीत राहत असल्याचे सुद्धा त्याने माहिती दिली.”
“पोलिसांनी राजावर पाळत ठेवून, तो घरी असण्याची खात्री करून, अचानक धाड टाकून त्याला ताब्यात घेतले असता, पोलीस चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याच्या घरातून फसवणूक करून लांबवण्यात आलेली रक्कमही पोलिसांना मिळून आली आहे.” असे आवर्तन पवईशी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाई म्हाडेश्वर यांनी सांगितले.
राजावर पवई व्यतिरिक्त घाटकोपर, पंतनगर, अंधेरी, जोगेश्वरी अशा मुंबईतील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे गुन्हे नोंद असून, २०१५ मध्ये त्यास पंतनगर पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकही केली होती. आता मुंबईतील विविध पोलीस स्टेशन आपआपल्या गुन्ह्यात त्याचा ताबा घेत आहेत.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.