डंपरच्या धडकेत दोन ठार, १ जखमी

जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोडवर घडली घटना, डंपरचे ब्रेक निकामी झाल्याने दोन कार, एक रिक्षा, एक टॅक्सी, एक सिमेंट मिक्सचरसह मोटारसायकलला दिली धडक

jvlr accidentरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी जोगेश्वरी- विक्रोळी लिंकरोडवर घडली आहे. डंपरचे ब्रेक निकामी झाल्याने दोन कार, एक रिक्षा, एक टॅक्सी, एक सिमेंट मिक्सचर सह मोटारसायकलला चिरडत डंपर मातीच्या ढिगाऱ्यात जावून थांबला. याप्रकरणी आरे पोलिसांनी निष्काळजीपणे गाडी चालवणे व मृत्यूस कारणीभूत ठरणे या कलमांतर्गत गुन्हा नोंद करुन डम्परचालक रविंदर सिंग (४६) याला अटक केली आहे.

शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास डंपर क्रमांक एमएच ०४ एस बी ८८७५ हा जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोडवरून पवईच्या दिशेने भरधाव धावत होता. येथील रिलायन्स बस स्थानकाजवळ आल्यावर डंपरचा ब्रेक फेल झाल्याने त्याने समोर चालणाऱ्या एका रिक्षाला व कारला धडक दिली, त्यातून निघून लगेच डंपर पुढे एक टॅक्सी व सिमेंट मिक्सचरला रगडत पुढे निघाला व त्यांच्या पुढे असणाऱ्या अजून एका कारला पाठीमागून धडक देत तिचा चुरा केला. अखेर पुढे जात असणाऱ्या दुचाकीस्वारांना आपल्या टायरखाली चिरडत डंपर रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या मातीच्या ढिगाऱ्यावर जावून थांबला.

या भीषण अपघातात टायरखाली आल्याने एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला. त्याच्या साथीदारास जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारा दरम्यान त्याचा सुद्धा मृत्यू झाला. मित्तल विनोदभाई चव्हाण (२२) व यश जितेंद्र दोडिया (२१) अशी मृतांची नावे आहेत. ते दोघेही बोरीवली भागातील रहिवाशी आहेत. कारमधील एक इसम किरकोळ जखमी झाला आहे.

यावेळी प्रवास करत असणारे मुंबईकर आणि स्थानिक यांनी डंपर चालकाला पकडत बेदम चोप दिला आहे. माहिती मिळताच आरे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

याबाबत बोलताना प्रत्यक्षदर्शिनी सांगितले, “सीप्झ जवळ एका कारला टक्कर मारल्यानंतर डंपर ड्रायवर हा तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र रस्त्यावर धावत असणाऱ्या इतर वाहनांमधून त्याला ते शक्य न झाल्याने त्याने वाहनांना चिरडत प्रवास सुरु ठेवला. पुढे एका सिमेंट मिक्सरला धडकल्याने त्याची दिशा बदलली आणि तो जावून मातीच्या ढिगाऱ्यात अडकून थांबला. मात्र तो पर्यंत उशीर झाला होता आणि त्याच्याखाली चिरडून दोघांचा मृत्यू झाला.”

“डंपर चालका विरोधात निष्काळजीपणे गाडी चालवणे, मृत्यूस कारणीभूत ठरणे अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत त्याला आम्ही अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे” अशी माहिती आवर्तन पवईशी बोलताना आरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चव्हाण यांनी दिली.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!