तिरंदाज व्हिलेज पालिका शाळेत इमारतीच्या स्लबचे पोपडे निघून पावसाळ्यात पाणी गळती होत होती. तसेच परिसरात शेवाळ तयार झाल्याने मुले घसरून पडण्याची शक्यता वाढली होती. याची दखल घेत स्थानिक नगरसेविका यांच्या प्रयत्नातून शाळा इमारत दुरुस्तीचे काम सुरु झाले आहे.
खाजगी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा कल वाढल्यामुळे पालिकेच्या शाळांमध्ये आधीच मुलांची संख्या कमी झाली होती त्यातच मुंबईतील अनेक पालिका शाळांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी पडायला आलेल्या भिंती आणि छ्तांखाली विद्यार्थी जीव मुठीत घेवून शिक्षण घेत असतात. पवई आयआयटी येथील तिरंदाज शाळेची सुद्धा गेल्या काही वर्षात अशीच अवस्था झाली होती. येथील छतांच्या पोपड्या निघून छत गळू लागले होते. शाळेच्या प्रांगणात पाणी साठून राहून शेवाळ निर्माण झाले होते.
स्थानिक नगरसेविका (वॉर्ड क्रमांक १२२) सौ. वैशाली पाटील यांच्या ही बाब समोर येताच त्यांनी गेल्या आठवड्यात पालिका ‘एस’ बांधकाम विभागाचे बी. मेघराजनी साहेब यांच्या सोबत शाळेची पाहणी केली. येत्या काही दिवसात शाळेच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्याचे यावेळी मेघराजनी यांनी आश्वासन दिले.
“विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत त्यांच्या माध्यमातून देशाची प्रगती करायची असेल तर त्यांची प्रगती होणे आवश्यक आहे आणि त्याची पहिली पायरी म्हणजे त्यांना योग्य आणि सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळणे. म्हणून आम्ही पालिकेच्या माध्यमातून शाळेच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून अजूनही काही सुविधा देता येतील का? याची सुद्धा आम्ही माहिती मिळवून आवश्यक त्या सर्व सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करू” असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना पाटील यांनी सांगितले.
No comments yet.