मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निर्णय नुकतेच जाहीर झाले असून, पवईतील प्रभाग क्रमांक १२२ मध्ये गेली २५ वर्ष सत्ता असणाऱ्या राष्ट्रवादीच्या गडावर भाजपाची उमेदवार वैशाली पाटील यांनी ४८७० मते मिळवत ७०० मताधिक्याने विजयी होत कमळ फुलवले. दुसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी (४१४०), तिसऱ्या स्थानावर शिवसेना (३५८९) तर चौथ्या स्थानावर कॉंग्रेस (१३०७) पक्षाला समाधान मानावे लागले आहे. प्रभाग क्रमांक १२१ मधून शिवसेनेच्या चंद्रावती मोरे यांनी बाजी मारत आपली सत्ता स्थापित केली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या पवई प्रभाग क्रमांक १२२ मध्ये मैदानात उतरलेल्या उमेदवारांसाठी मंगळवारी झालेल्या मतदानात मतदारांनी उस्फुर्त प्रतिसाद देत ५२.४४% मतदान केले होते. ज्यातील तिरंदाज व्हिलेज उच्च मराठी शाळेत झालेले ५८२३ आणि एस एम शेट्टी शाळेत झालेले ५७१५ मतदान संपूर्ण डाव पालटून टाकणारे होते.
आज (२३ फेब्रुवारीला) होणाऱ्या मतमोजणीत जनता कोणाच्या दिशेने कौल देणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. सकाळी १०.१५ च्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या ४ फेऱ्यांमध्ये मनसे- १३७, अपक्ष- २४७, कॉग्रेस-६७८, शिवसेना- १८५३, भाजप-१८३८, बिआरएसपी- १६६, डीवायएफआय- ३५८, राष्ट्रवादी- २७४७ अशी मते घेत या प्रभागात वर्चस्व असणाऱ्या राष्ट्रवादी पार्टीने आघाडी घेतली होती. पाठोपाठ शिवसेना आणि तिसऱ्या स्थानावर भाजपा होती.
तिरंदाज शाळेचे निर्णय येता येता भाजपाने आपले तिसरे स्थान कायम राखले होते. मात्र, एस एम शेट्टी शाळेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आणि भाजपाने मुसंडी मारत शिवसेना आणि राष्ट्रवादीला पाठीमागे टाकत ४८७० मते मिळवत आपला विजय पक्का केला.
१२१ मधून चुरशीच्या लढतीत शिवसेनेचा विजय
१२१ मधून एक सामान्य कुटुंबातून मैदानात उतरलेल्या चंद्रावती मोरे यांनी दमदार मतांनी विजय मिळवत पवईचा हा गड आपल्या नावावर करून घेतला. प्रभाग १२१ हा आंबेडकरी विचाराच्या पक्षांना मानणारा प्रभाग म्हणून ओळखला जातो. या स्तरातील मतदारांची संख्याही या प्रभागात खूप मोठी आहे. त्यातच बिएसपीच्या उमेदवार सुषमा बिऱ्हाडे यांचे पती प्रकाश बिऱ्हाडे यांनी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानात बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळ्याला मंजुरी होऊनही पुतळा बसवला जात नसल्याने आंदोलन करत कोणत्याही दबावाला न जुमानता पुतळ्याची स्थापना केल्यामुळे अनेकांच्या मनात घर केले होते. याचा फायदा त्यांना या लढतीत नक्की होणार असल्याने शिवसेनेसाठी ही कडवी झुंज होती. मात्र त्यावर मात करत चंद्रावती मोरे यांनी येथे विजयी पताका रोवली.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.