इंटरनेट आणि व्हिडीओ गेमच्या जगात मैदानी आणि पारंपारिक खेळापासून मुले वंचित होत चालली आहेत, हे पाहता क्रांती महासुर्य संत शिरोमणी रविदास ६३९ व्या जयंतीचे औचित्य साधत आंतरराष्ट्रीय संघटना तफिसा (TAFISA), ऑल मुंबई असोसिएशन ऑफ स्पोटस् अँड फिटनेस फॉर ऑल आणि पवई प्रिमियर लिग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील गावदेवी मैदानात मुलांसाठी लोप पावलेल्या पारंपारिक कला क्रीडांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.
या स्पर्धेत विटी-दांडू, गोट्या, भवरा, लिंगोचा, बँचकी / फटकी, सागर गोट्या, आठ-चल्लस, टिपरी, दोर-उडी, फुगडी, कांदाफोडी, डब्बा ऐसपैस अशा लोप पावत चाललेल्या खेळांचा समावेश करण्यात आला होता. पवईमधील विविध शाळातील मुलांनी मोठ्या संख्येने यात सहभाग नोंदवत, पारंपारिक खेळांचा आनंद लुटला.
इंटरनेट आणि व्हिडीओ गेममुळे मुले सध्या मैदानी खेळ खेळणे पूर्णपणे विसरून घरातच रमत आहेत. या घरातील खेळांमुळे मुलांच्या बौद्धिक विकासासोबतच शारिरिक विकासही खुंटत असून भविष्यात त्यांना अनेक प्रसंगांचा सामना करावा लागतो.
याबाबत तफिसा संस्थेचे रमेश जाधव यांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले, “आम्ही ऑल मुंबई असोसिएशन ऑफ स्पोटस् अँड फिटनेस फॉर ऑल आणि पवई प्रिमियर लिग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील लोप पावलेल्या पारंपारिक कला, क्रिडांना नव्याने उजाळा देण्यासाठी पारंपारिक खेळांचे आयोजन केले होते. मोबाईल गेम आणि संगणकावरील गेम्समुळे होणा-या दुष्परिणामांपासून देशातील भावी पिढीला सावध करुन मैदानी खेळांची आवड निर्माण करणे, ऱाष्ट्रीय एकात्मता, बंधूभाव निर्माण करुन देशाचे नाव जागतिक पातळीवर सुवर्ण अक्षरात नोंदवावे या उद्देशाने पवईत प्रथमच लोप पावलेल्या कला क्रिडा विटी-दांडू, गोट्या, भवरा, लिंगोचा, बँचकी/फटकी, सागर गोट्या, आठ-चल्लस, टिपरी, दोर-उडी, फुगडी, कांदाफोडी, डब्बा ऐसपैस यासारख्या खेळांच्या स्पर्धांचे आयोजन केले गेले होते.”
मा. आमदार सुनिल राऊत आणि मान्यवरांच्या शुभहस्ते सहभागी विध्यार्थ्यांना प्रमाणपञ देवून गौरवण्यात आले.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.