पवई उद्यानात भीम अनुयायांनी बसविला बाबासाहेबांचा पूर्णाकृती भव्य पुतळा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचा १० वर्षाचा वनवास संपला, शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती निमित्त आंबेडकरी जनतेची बाबासाहेबांना मानवंदना

ambedkar-putala
वईतील एल अँड टी समोरील उद्यानाला ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांचे नाव दिले असताना व या उद्यानात पुतळा बसविण्यास २००८ साली विधिमंडळाने मंजुरी दिली असताना सुद्धा पालिका प्रशासन याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याने अखेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल २०१६ रोजी साजरी करण्यात आलेल्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीचे औचित्य साधत पवईतील भीमसैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १५ फूट उंच पूर्णाकृती पुतळा उद्यानात बसविला आहे. गोरेगाव, पवई, निटी, चांदीवली, साकिनाका, घाटकोपर, विक्रोळी, जोगेश्वरी या भागातील २ हजारांपेक्षा अधिक भीम अनुयायी यावेळी या ठिकाणी उपस्थित होते.

पालिकेच्या पूर्वपरवानगीशिवाय पुतळा बसवला असल्याने, पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी कारवाई होवू शकते आणि त्यामुळे स्थानिक आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या जावून त्याचे उलट पडसाद उमटतील हे पाहता पवई पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त सुद्धा लावला असल्याने वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले आहे.

पवई भागात मोठ्या प्रमाणात आंबेडकरी जनता राहते, मात्र या परिसरात या जनतेचे श्रद्धास्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कोठेच बसवण्यात आलेला नाही. जे पाहता पवई येथील एल अँड टी समोरील २२ एकर भूखंडावर मुंबई महापालिकेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे, तेथे बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी स्थानिकांकडून केली जात होती. याबाबत शासकीय पातळीवर ‘पवई तलाव सेवा समिती’कडून कायदेशीर पत्रव्यवहार करून पुतळा बसविण्याची मागणी सुद्धा केली आहे.

२००८ साली विधिमंडळात सूचना क्र. ८५ नुसार ही जनतेची मागणी सर्वानुमते मंजूर करण्यात आली.स्थानीय पोलीस ठाण्याकडूनही त्यास ना-हरकत परवानगी मिळाली. पालिका ‘एस’ विभागाकडून पुतळयाच्या संरक्षणाचा आणि देखभालीचा सदर समितीकडून करारही करून घेण्यात आला. जिल्हा अधिकाऱ्यांनी सुद्धा चांगली भूमिका घेतली, मात्र सर्वोच्च न्यायालयाचा २०११ सालचा पुतळ्याबाबतच्या आदेशाचा हवाला देत महापालिकेने अचानक पुतळा बसविण्यास हरकत घेतली आहे.

याबाबत बोलताना स्थानिकांनी सांगितले, “न्यायालयाच्या आदेशानंतरही राज्यात अनेक ठिकाणी पुतळे बसविले गेले आहेत. न्यायालयाचा आदेश २०११ मध्ये आला आहे, मात्र या पुतळ्याला २००८ मध्येच मंजुरी मिळाली आहे. पालिका जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत चालढकल करत आहे. पालिकेने उद्यानाला बाबासाहेबांचे नाव तर दिले आहे, मात्र गेल्या चार वर्षापासून ते नामफलकही त्यांनी कपड्यांनी झाकून ठेवलेले आहे. हा पालिका प्रशासनाचा जातीयवादीपणाच म्हणवा लागेल. अखेर पालिकेची वाट बघत बसण्यापेक्षा महामानवाच्या शतकोत्तर जयंती निम्मित आंबेडकरी जनतेने उद्यानात पुतळा उभारून बाबासाहेबांना मानवंदना देत ढिसाळ काम करणाऱ्या प्रशासनाला चपराक दिली आहे.

“जगभरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जात असताना, मुंबई महानगरपालिका मात्र या महामानवाच्या पुतळ्याला विरोध करत आहे. महापालिकेला बाबासाहेबांचे महत्व समजत नाही आहे या पेक्षा दुसरे दुर्दैव ते कोणते? पुतळयाबाबतची जनतेची व समितीची लढाई ही कायदेशीर आहे, त्या मार्गानेच आम्ही हा लढा लढणार आहोत,” असे पवई तलाव सेवा समितीचे अध्यक्ष प्रकाश बिऱ्हाडे यांनी आवर्तन पवईला सांगितले.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!