पवईतील लेकहोममधील आगीच्या जखमा अजून ताज्या असतानाच, आज (बुधवारी) याच परिसरातील एव्हरेस्ट हाईट या गगनचुंबी इमारतीच्या १०व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १००३ मध्ये दुपारी ३.५० वाजता एसीत शोर्ट सर्किट होऊन आग लागली. मुंबई अग्निशमन दलाच्या ४ टँकर्स, ३ बंब, २ स्कायलिफ्टच्या साहय्याने काही तासांतच अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. स्थानिक नागरिक आणि कामगारांनी तत्परता दाखवत संपूर्ण इमारत काही वेळातच रिकामी केल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
गेल्या वर्षी जुन महिन्यात लेकहोम मधील लेकलुक्रीन इमारतीला आग लागून ७ लोक मृत्युमुखी पडले होते, तर २२ लोक जखमी झाले होते. या आगीची राख नुसतीच थंडावलेली असताना, आज होळीच्या दिवशी याच परिसरातील एव्हरेस्ट हाईट या गगनचुंबी इमारतीच्या फ्लॅट क्रमांक १००३ मध्ये दुपारी एसीत शोर्ट सर्किट झाल्याने आग लागली. सुरुवातीला केवळ एसी पर्यंत मर्यादित असणाऱ्या आगीने मात्र दुपारी असणाऱ्या गरम हवेमुळे उग्र रूप धारण करत संपूर्ण फ्लॅट आपल्या विळख्यात घेतला. ४ टँकर्स, ३ बंब आणि मुंबई अग्निशमन दलात नव्यानेच दाखल झालेल्या २ स्कायलिफ्टसह घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत संपूर्ण फ्लॅट व आतमधील सामान जळून खाक झाले होते.
“आम्ही दुपारी घरात आराम करत असताना टायर जळल्यासारखा वास आल्याने माझ्या मुलीने बाहेर जावून पाहिले असता, वरील माळ्यावरून धूर निघत असल्याचे दिसले. तिने घरात सर्वांना याबाबत सूचना देताच आम्ही इतर फ्लॅटधारकांना सूचित करत इमारतीच्या खाली धाव घेतली. सुरक्षारक्षक, ड्रायव्हर आणि इतर कामगारांच्या मदतीने इमारतीत असणाऱ्या जेष्ठ नागरिक व महिलांना लगेचच इमारतीतून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले”, असे आवर्तन पवईशी बोलताना सहाव्या मजल्यावर राहणाऱ्या महिलेने सांगितले.
अजून एका स्थानिकाने याबाबत बोलताना सांगितले “आम्ही अग्निशमन दलाचे विशेष आभारी आहोत. त्यांनी माहित मिळताच त्वरित धाव घेत, योग्य नियोजनबद्ध पद्दतीने काम करत, काही क्षणातच आगीवर नियंत्रण मिळवले. यामुळे होळीच्या दिवशीच आमच्या घरांची होणारी होळी टळली आहे.”
“अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असून, त्यांचा तपास चालू आहे. मात्र प्रथम दर्शनी ही आग एसीमध्ये शोर्टसर्किट होऊनच लागल्याचेच समोर येत आहे. काल एसीचे काम केल्याचीही माहिती समोर येत आहे”, असे आवर्तन पवईशी बोलताना पवई पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.