नापास होण्याच्या भितीने पवईतून पळून गेलेली दोन भावंडे तीन वर्षांनी सापडली

handवार्षिक परीक्षेत कमी गुण मिळतील आणि आपले आई वडील आपल्याला रागावतील, या भितीपोटी तीन वर्षापूर्वी पवई येथील आपल्या राहत्या घरातून कोणालाही न सांगता पळून गेलेल्या दोन भावांना दहिसर आणि अहमदनगर येथून शोधून काढण्यात गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे.

हॉटेल व्यावसायिक सुदर्शन मौर्या हे आपल्या कुटुंबियांसोबत पवई परिसरात राहतात. २९ एप्रिल २०१३ रोजी, मोर्या यांची इयत्ता पाचवीत शिकणारा (वय वर्ष ११) व इयत्ता चौथीत शिकणारा (वय वर्ष नऊ) अशी दोन्ही मुले हे आपल्या राहत्या घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेली होती. रात्री उशिरापर्यंत दोन्ही मुले घरी न आल्याने त्यांचा परिसरात सगळीकडे आणि मित्रमंडळीकडे शोध सुरु केला मात्र ती सापडली नाहीत. अखेर सुदर्शन मौर्या यांनी पवई पोलीस स्टेशनमध्ये आपली दोन्ही मुले हरवली असल्याची तक्रार दाखल केली होती.

स्थानिक पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न करूनही मुले सापडत नसल्याने, दरम्यानच्या काळात गुन्हे शाखेकडे समांतर तपास सुरु झाला होता.

३ दिवसापूर्वी अचानक मोठ्या मुलाने मोर्या यांना फोन करून तो दहिसरमध्ये असून, त्याला घरी यायचे असल्याचे सांगितले. मोर्या यांनी लगेच ही माहिती सोनसाखळी चोरी विरोधी पथकाचे जबीर पठाण यांना दिली. माहिती मिळताच प्रतिबंध कक्षाच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या मुलाला दहिसर येथून तर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे लहान मुलाला नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथून शोधून काढले.

घरातून निघून गेलेल्या या दोघा भावंडांना पोलिसांनी विचारणा केली असता, त्यांनी वार्षिक परीक्षेत कमी गुण मिळतील व आईवडील रागवतील, अशी भीती वाटल्याने घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेल्याचे सांगितले.

तीन वर्षापूर्वी घरातून निघून गेल्यानंतर ते दोघेही मुंबईतून पहिले मनमाडला गेले. तेथे रेल्वे स्थानक परिसरात पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि चणे शेंगदाणे विकत एक वर्ष काढले. नोकरीच्या शोधात असताना लहान भावाला अहमदनगर येथील कोपरगावात काम मिळाले, तर मोठ्या भावाला दहिसर येथे काम मिळाले होते, असे त्यांनी पोलीस जवाबात सांगितले आहे.

“दहिसर येथे काम करणाऱ्या मोठ्या मुलाला तीन वर्षानंतर आपल्या घरची आठवण आल्याने त्याने घरी फोन करून मला घरी यायचे असल्याचे वडिलांना सांगितले. आम्हाला ही माहिती मिळताच काही तासातच मुलांना शोधून काढून त्या दोघांना पालकांच्या हवाली केले आहे” असे वरिष्ठ अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितले.

“होळीच्या काळात माझी दोन्ही मुले मला परत मिळालेली आहेत, यापेक्षा होळीची मोठी भेट ती काय होऊ शकते,” असे मोर्या यांनी भरलेल्या अंतकरणाने सांगितले.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!