मुंबईत आज सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने आणि भरतीमुळे पाण्याच्या पातळीत झालेल्या वाढीमुळे पवई तलावात सुरु असणारे गणेश विसर्जन काही काळासाठी थांबवण्यात आले होते. मात्र पावसाचा जोर ओसरताच पवई तलावातील विसर्जन कार्य पूर्ववत झाले आहे.
शुक्रवारी विराजमान झालेल्या गणेशांपैकी पाच दिवसांच्या गणपतींचे आज ठिकठिकाणी विसर्जन करण्यात येणार आहे. पूर्व उपनगरातील अनेक गणेशांचे पवई तलावात विसर्जन केले जाते. शनिवारी दिड दिवसांच्या गणेशांचे सुरळीत विसर्जन झाल्यानंतर, आज पाचव्या दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी पवई पोलिसांसह, साकीनाका वाहतूक विभाग, पालिका एस विभाग आणि स्वयंसेवी संस्था सर्व सज्ज झाले आहेत. मात्र आज सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे आणि संध्याकाळी ४.३३ वाजता भरतीचा काळ असल्याने पवई तलावाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ज्याला पाहता विसर्जनासाठी तलावात उतरलेल्या तरुणांच्या सुरक्षिततेसाठी काही काळासाठी तलावात होणारे विसर्जन थांबवण्यात आले होते मात्र आता पाऊस कमी होताच पूर्ण सुरक्षेसह विसर्जन पुन्हा सुरु करण्यात आले आहे.
“आज दिवसभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तलावाच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच संध्याकाळचा काळ हा भरतीचा काळ होता तो जवळपास ७.३० पर्यंत चालेल म्हणून आम्ही सुरक्षिततेचा उपाय म्हणून मोठ्या गणेशांचे विसर्जन थांबवून फक्त छोट्या गणपतींना प्राधान्य दिले आहे. पावसाचा जोर ओसरताच विसर्जनाचे संपूर्ण काम पूर्ववत होईल” असे याबाबत बोलताना पालिका अधिकाऱ्याने सांगितले.
No comments yet.