पवईतील अँकर ब्लॉक येथे तानसा पूर्व सागरी ९०० मी.मी. व्यासाच्या झडपाच्या दुरुस्ती आणि पवई उच्चस्तरीय जलाशय-१च्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेतर्फे हाती घेण्यात आले आहे. मंगळवार, २३ मार्चला या कामामुळे पालिका ‘एस’ विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पवईतील काही भागात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व, धारावी, वांद्रे भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
पालिका जल अभियंता विभागातर्फे ही दुरुस्ती करण्यात येत असून, पालिका ‘एस’ विभागातील महात्मा फुलेनगर, फिल्टरपाडा, बेस्टनगर, जयभिमनगर, गौतमनगर, टेम्पोनाका, पठाणवाडी, गावदेवी, आरे रोड परिसरात सकाळी १० ते संध्याकाळी १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मंगळवारी होणाऱ्या या कामामुळे आदल्या दिवशी (सोमवार) नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.
या कामामुळे पवईतील प्रभाग क्रमांक १२१ मधील भागात पाणीपुरवठा बंद असला तरी प्रभाग क्रमांक १२२ मधील भागात याचा परिणाम होणार नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे. मात्र डोंगराळ भागात असणाऱ्या परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबईतील अंधेरी पूर्वमधील चकाला, जेबीनगर, मरोळ, सहार, विमानतळ मार्ग आणि सिप्झ भागात सुद्धा कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तसेच वांद्रे पूर्व आणि धारावी भागात सुद्धा पाणी पुरवठ्यावर परिणाम जाणवेल असे पालिकेतर्फे सांगण्यात येत आहे.
No comments yet.