जन्माच्या ३ तासातच बाळाला उच्च तापाची लक्षणे दिसल्याने केलेल्या तपासणीत बाळाचा अहवाल आला होता कोरोना पॉझिटिव्ह.
एका १८ दिवसांच्या बाळाने (baby) कोरोना व्हायरसचा (coronavirus) पराभव (defeats) करत कोरोनामुक्त झाल्याची आनंददायी आणि आशादायी बातमी समोर येत आहे. गुरुवारी पवईतील हिरानंदानी रुग्णालयातून बाळाला घरी सोडण्यात आले आहे. सर्वात कमी वयात कोरोना व्हायरसचा पराभव करत घरी परतणारे ते भारतातील पहिले बाळ असू शकते. विशेष म्हणजे बाळाच्या आईचा अहवाल हा निगेटिव्ह आला आहे.
एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच त्यातून बरे होणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे. विशेष म्हणजे या विषाणूंनी लहान मुलांना सुद्धा बाधित केले आहे. मात्र जवळपास सगळ्याच लहान मुलांनी यावर मात करत कोरोनामुक्त झाल्याची उदाहरणे आहेत. खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ट्विटरवरून ३६ दिवसाचं बाळ सायन रुग्णालयातून कोरोनामुक्त होऊन घरी जात असतानाचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. लहान मुलांचे बरे होण्याचे प्रमाण पाहता हे एक मोठे आशादायी चित्रच म्हणावे लागेल.
या संदर्भात रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, १० मे रोजी एका खासगी नर्सिंग होममध्ये बाळाचा जन्म झाला. जन्मानंतर काही तासातच त्याला उच्च तापाची लक्षणे दिसू लागली. बाळाला ताप आणि श्वसनाचा विकार जाणवू लागल्याने त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर बाळाला कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
“आमच्याकडे हे बाळ आले तेव्हा त्याला ताप आणि श्वसनाचा त्रास जाणवत होता. उपचारानंतर बाळ आता स्वस्थ आहे. बाळाला आता डिस्चार्ज देण्यात आला आहे,” असे रूग्णालयाच्या बालरोग तज्ज्ञ डॉ बिजल श्रीवास्तव यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना सांगितलं.
“आम्ही आतापर्यंत कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह आलेल्या १४ मातांची प्रसूती केली आहे. सर्व बाळांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आहेत,” असे बालरोगतज्ज्ञ डॉ संजीव आहुजा यांनी यावेळी बोलताना सांगितले.
अशी अनेक चांगली उदाहरणे राज्यात आणि देशात आहेत. त्यामुळे कोरोनाला घाबरण्याची आवश्यकता नाही. काळजी घ्या, नियमांचे पालन करा आणि त्यानंतरही संसर्ग झालाच तर बरे होणार आहात हा विश्वास ठेवा.
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
[…] […]