साकीनाका परिसरातून मोटारसायकल चोरी करून मुंबईत सोनसाखळी चोरी करणाऱ्या एका १८ वर्षीय तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सरफराज उमर कुरेशी असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. रिमांड होममधून बाहेर येताच केवळ ४० दिवसात या चोरट्याने ४ गुन्हे केले आहेत.
एका अल्पवयीनच्या खुनाच्या गुन्ह्यात त्याला डोंगरी रिमांडहोममध्ये ठेवण्यात आले होते. १५ जानेवारी रोजी त्याची रिमांड होममधून सुटका होताच त्याने साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक मोटारसायकल चोरी करून, सोनसाखळी चोरी सुरु केली होती.
२५ फेब्रुवारीला पुनीत ठक्कर (३८) हे मोर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले असताना मोटारसायकलवरून आलेल्या एका तरुणाने त्यांच्या गळ्यातील ६० हजार किंमतीची सोन्याची चैन खेचून चोरी करून पळ काढला होता.
पोलिसांनी परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले. चोरट्याने लाल रंगाचे हेल्मेट घातले असल्याच्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी त्याला शिवडी, शिवाजीनगर सर्कल, चेंबूर अशा विविध भागात ट्रेस केले. “बैलबाजार येथील एका गल्लीत मोटारसायकल पार्क करून तो निघून गेल्याचे समोर आले होते. त्या अनुषंगाने विविध पोलीस ठाण्याची पथके बनवून पाळत ठेवून २ दिवसाच्या प्रतीक्षेनंतर त्याला गाडी घेण्यासाठी आलेले असताना अटक केली,” असे यासंदर्भात पोलिसांनी सांगितले.
१ मार्च रोजी चेंबूर येथे सुद्धा त्याने सोनसाखळी चोरीचा प्रयत्न केला होता, मात्र चैन हातातून निसटून पडल्याने त्याने चैन न घेताच पळ काढला होता.
एक फळ विक्रेत्याचा मुलगा असणारा सरफराज चोरी केलेल्या चैन विकून त्यातून मिळणाऱ्या पैशातून आपल्या प्रेयसीसोबत मौजमस्ती करत असे. तसेच महागड्या हॉटेलमध्ये जेवणासाठी जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
No comments yet.