पवईत भरधाव डंपर मेट्रो बॅरिकेडवर धडकला; सुरक्षारक्षक जखमी

पवई मेट्रो साईट फाईल फोटो

पवईतील बांधकामाधिन मेट्रो साइईटवर बुधवारी पहाटे एका वेगवान डंपरने बॅरिकेडला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात येथे तैनात असलेला ५३ वर्षीय सुरक्षा रक्षक जखमी झाला असून, त्याच्या डोक्याला, मानेला आणि पाठीला दुखापत झाली आहे.

पवई पोलिसांनी डंपर चालक रेहमान शेख (३२) याला भादवि कलमांखाली बेदरकारपणे गाडी चालवल्याप्रकरणी आणि जीव धोक्यात घातल्याप्रकरणी अटक केली आहे.

ही घटना पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. शेख यांनी पोलिसांना दिलेल्या आपल्या जवाबात गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले. “धडक लागल्याने खड्ड्यात जात डंपर पलटून घटनास्थळावरील बॅरिकेड कोसळले आणि येथे तैनात सुरक्षा रक्षक विजय शहा (५३) याच्यावर पडले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या साईट पर्यवेक्षकाने शहा यांना तातडीने रुग्णालयात नेले जेथे त्यांना वैद्यकीय मदत देत प्राथमिक उपचार करण्यात आले,” असे याबाबत बोलताना पवई पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

शेखने दारूच्या नशेत वाहन चालवले होते का, याचा शोध घेण्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!