चेंबूर पालिका प्रभाग अधिकाऱ्यांनी इंग्रजी कागदपत्रे सादर केल्याने चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे पाटील संतापले. त्यांनी ती कागदपत्रे फाडून अधिकाऱ्यांकडे भिरकावली. “शासन निर्णय असताना देखील अधिकारी इंग्रजीतच कामकाज करतात. मराठी भाषेचा अपमान आम्ही सहन करणार नाही. पुन्हा जर असे घडले तर अधिकाऱ्यांना कडक उत्तर देऊ.” – आमदार दिलीप मामा लांडे
इंग्रजीत सगळा कारभार करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना चांदिवलीचे आमदार दिलीप मामा लांडे यांनी सोमवारी चांगलाच दणका दिला. चांदिवली विधानसभा अखत्यारीत येणाऱ्या अंधेरी – कुर्ला रस्त्याच्या रुंदीकरणात बाधित होणारे घरमालक आणि दुकानदारांच्या नावाची यादी अधिकाऱ्यांनी मराठी ऐवजी इंग्रजीत सादर केली. यादी पाहताच शिवसेना आमदार दिलीप लांडे संतप्त झाले, त्यांनी चेंबूर पालिका प्रभाग अधिकाऱ्यांनी सादर केलेली इंग्रजी कागदपत्रे फाडून भिरकावली.
यावेळी लांडे यांनी मराठी भाषेचा मान राखण्याचा सल्ला सुद्धा अधिकाऱ्यांना दिला. त्यांच्या या पवित्र्याने हबकलेल्या अधिकाऱ्यांनी तातडीने मराठी कागदपत्रे सादर करण्याची हमी दिली.
राज्यकारभाराची आणि पालिकेच्या कामकाजाची भाषा ही मराठी आहे. तशा आदेशाचे जीआरसुद्धा काढण्यात आले आहेत. तरीही असा प्रकार घडतो कसा? असा प्रश्नही त्यांनी याबाबत बोलताना उपस्थित केला.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठीमागील आठवड्यात केंद्र शासनाकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी केली आहे. “कार्यालयात मराठी भाषेच्या वापराचा सरकारी निर्णय असताना सुद्धा अधिकारी इंग्रजीत कामकाज करतात. त्यामुळे आपण कागदपत्रे स्विकारण्यास नकार दिला,” असे याबाबत बोलताना लांडे म्हणाले.
पालिकेच्या एम- पश्चिम विभागात अंधेरी कुर्ला रोड रुंदीकरणाच्या कामात बाधित घर आणि दुकान मालकांच्या निर्णयावर एक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी पालिका उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांच्यासह पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
No comments yet.