‘पुनीत सागर अभियान’ उपक्रमाचा एक भाग म्हणून राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), २ महाराष्ट्र इंजिनिअरिंग रेजिमेंट – मुंबई ‘ए’तर्फे रविवार, ४ डिसेंबरला तलाव स्वच्छता कार्यक्रम पवई तलाव येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी या रेजिमेंटच्या कॅडेट्सनी सुमारे १९६ किलो प्लॅस्टिक कचरा गोळा करून तो कचरा रिसायकलिंगसाठी सुपूर्द केला.
जलस्रोतांना प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या महत्त्वाबद्दल स्थानिक लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि मानवांसाठी एकमेव घर असणाऱ्या धरतीवरील जलस्त्रोतांना प्रदूषणमुक्त ठेवणे आणि त्याच्यावरील ताण कमी करण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता.
राष्ट्रीय छात्र सेनाच्या विद्यार्थ्यांनी देशातले समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी १ डिसेंबर २०२१ रोजी ‘पुनीत सागर अभियान’ ही देशव्यापी मोहीम सुरू केली. सागरी स्वच्छतेच्या महत्त्वाविषयी जनजागृती करत, प्लॅस्टिक आणि इतर टाकाऊ पदार्थांपासून समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी ही मोहीम सुरुवातीला केवळ एका महिन्यासाठी सुरू केली होती. नद्या आणि इतर जलस्रोतांना देखील स्वच्छ करण्यासाठी या मोहिमेचा नंतर संपूर्ण भारतभर विस्तार करण्यात आला.
‘पुनीत सागर अभियान’ सुरू झाल्यापासून, १२ लाखांहून अधिक एनसीसी छात्रांनी, तसेच माजी विद्यार्थी संघटना आणि स्वयंसेवकांनी मिळून सुमारे १,९०० ठिकाणांहून प्लास्टिक कचरा गोळा केला असून, संकलित केलेला कचरा पुनर्वापरासाठी सुपूर्द करण्यात आला आहे.
रविवारी २ महाराष्ट्र इंजिनिअरिंग रेजिमेंट नॅशनल कॅडेट कॉर्प्स आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांनी पवई तलाव परिसरात पुनीत सागर अभियान अंतर्गत मोहीम राबवत परिसरात असणारा प्लास्टिक आणि इतर कचरा जमा करत तलावावर पडत असणाऱ्या प्रदूषणाच्या भाराला कमी करण्याचा प्रयत्न केला.
काय आहे २ महाराष्ट्र इंजिनिअरिंग रेजिमेंट नॅशनल कॅडेट कॉर्प्स ?
२ महाराष्ट्र इंजिनिअरिंग रेजिमेंट नॅशनल कॅडेट कॉर्प्स आयआयटी बॉम्बे ही बॉम्बे इंजिनियर ग्रुपच्या अंतर्गत एक राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स युनिट आहे. ही भारतातील फक्त दोन राष्ट्रीय छात्र सेना इंजिनिअरिंग रेजिमेंटपैकी एक आहे. तरुणांना सशस्त्र दलात करिअर करण्यास प्रवृत्त करण्यासाठी योग्य वातावरण प्रदान करण्यात ही युनिट अग्रेसर आहे.
No comments yet.