चांदिवली जंक्शनला जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडसोबत (जेविएलआर) जोडणारा डी पी रोड जवळपास दीड महिन्याच्या बंदीनंतर अखेर सोमवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा रस्ता खुला करण्यात आल्यामुळे पाठीमागील महिनाभरात वाढलेल्या वाहतूक कोंडीतून ऐन पावसाळ्यात आणि शाळांच्या काळात दिलासा मिळणार आहे.
विकास नियोजन रस्ता ९ म्हणजेच डी पी रोड ९ हा सध्या चांदिवलीला जेविएलआरशी जोडणारा प्रमुख रस्ता आहे. मात्र पाठीमागील एका दशकात या रस्त्याची भयानक दुरावस्था झाली आहे. त्यातच या भागात अतिक्रमण वाढल्याने दगडातून असणारा एक छोटासा मार्गच येथे उरला होता. ज्यामुळे कशीबशी दोन वाहने या मार्गातून पास होत असतात. या मार्गाचा वापर कठीण होत चालल्याने स्थानिक नागरिक आणि संस्था यांनी पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे पत्रव्यवहार करत या रस्त्याच्या पुनर्निर्मितीची मागणी केली होती.
डिसेंबर २०२२ मध्ये या डी पी रोड ९चे कंत्राट मंजूर झालेले असताना देखील या रस्त्याच्या मुहूर्ताचा नारळ फुटायला फेब्रुवारी मध्य उजाडला होता. या रस्त्याच्या उद्घाटनावरून स्थानिक नगरसेवक आणि आमदार यांच्यात श्रेयवादाचा कलगी तुराही रंगला. मात्र अगदी वर्षभर म्हणजेच एप्रिल २०२४ पर्यंत हा रस्ता काही शे मीटर गटाराच्या कामाच्या पुढे गेला नव्हता.
स्थानिक नागरिक आणि चांदिवली सिटीझन रेसिडन्स वेल्फेअर असोसिएशनने पालिका प्रशासन आणि कंत्राटदार यांच्याकडे केलेल्या सतत पाठपुराव्यानंतर आणि काम सुरु करून दुसरा पावसाळा आला तरी रस्ता बनवला गेला नसल्याची आठवण करून दिल्यानंतर कंत्राटदाराने या रस्त्याच्या रामबागकडून चांदिवलीकडे येणाऱ्या वाहिनीवर काम सुरु केले होते.
मात्र रस्त्याच्या कामाच्या नावाखाली हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्याने शिवभक्तानी मार्गे जाणारा एकमेव मार्गच उरल्याने चांदिवली आणि पवई परिसरात राहणाऱ्या आणि कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
शाळा सुरु होण्याच्या आणि पावसाळ्याच्या अनुषंगाने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ‘आवर्तन पवई’ने कंत्राटदाराकडून या कामाचा आढावा घेतला तेव्हा त्याने पावसाला सुरु होण्यापूर्वी एक मार्ग बनवून वाहतुकीसाठी खुला करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र यावर्षी पावसाने वेळेत आगमन केल्याने त्याचा अंदाज चुकला. मात्र पावसाने थोडी विश्रांती घेताच एसबीआय बँक आणि क्रिस्टल पलेस इमारतीसमोर केबलच्या कामामुळे अडकलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करत हा मार्ग सोमवारी पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
No comments yet.