चांदीवली परिसरात वाढत्या वाहतूक कोंडी आणि अतिक्रमण विरोधात एकत्रित येत चांदिवलीकरांनी रविवारी, २१ एप्रिलला रस्त्यावर उतरून शांतता मोर्चा काढत आपला राग व्यक्त केला. चांदिवली रहिवाशी संघटनेतर्फे (चांदिवली सिटीझन्स वेल्फेअर असोसिशन) काढलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने चांदिवलीकर सहभागी झाले होते. आमच्या या समस्यांचे लवकरात लवकर निवारण नाही झाले तर २९ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानात “नोटा”चा पर्याय वापरण्याचा इशारा सुद्धा यावेळी नागरिकांनी दिला.
हातात विविध संदेश देणारे पोस्टर्स,बॅनरर्स घेवून हा निषेध मोर्चा चांदिवली डी-मार्ट येथून सुरुवात करून संपूर्ण चांदिवली परिसरात काढण्यात आला.
म्हाडा कॉलोनीज आणि काही निवडक इमारती असणाऱ्या चांदिवलीचे पाठीमागील काही वर्षात रुपडेच पालटले आहे. नहार अम्रित शक्ती सारख्या कॉम्प्लेक्ससह अनेक रहिवाशी इमारती सध्या या भागात उभ्या राहिल्या आहेत. काही भागात इमारतींच्या निर्मितीचे काम सुरु आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या रहिवाशांच्या सोयीसाठी शॉपिंग कॉम्प्लेक्स, शाळासह अनेक सुविधा या भागात निर्माण करण्यात आल्या आहेत. मात्र प्राथमिक सुविधा मात्र तेवढ्याच राहिल्याने वाहतूक कोंडीची मोठी समस्या या भागाला सतावत आहे.
‘आपण एकविसाव्या शतकात राहत असलो तरी येथील सुविधा मात्र एकोणिसाव्या शतकातील आहेत. परिसरात अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या बाहेरील जागेवर फुटपाथवर अतिक्रमण केल्याने चालण्यास जागा उरलेल्या नाहीत. बेकायदेशीर फेरीवाल्यांची परिसरात वाढती संख्या स्थानिक नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला याबाबत वारंवार तक्रारी करून सुद्धा याबाबत दुर्लक्ष करत असल्यामुळे आम्ही नागरिक एकत्रित रित्या रस्त्यावर उतरलो आहोत, असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना संस्थेचे संस्थापक सदस्य आणि सिंक्रोनीसिटीमधील रहिवाशी मनदीप सिंग यांनी सांगितले.
डी-मार्टजवळून निघालेल्या या मोर्चातून लोकांनी अनधिकृतरित्या फुटपाथवर अतिक्रमण केलेल्या लोकांना गुलाबाची फुले वाटून ‘गांधीगिरी”च्या मार्गातून फुटपाथ आणि रस्ते रिकामे करण्याची विनंती करण्यात आली.
“चांदिवली भागातून बाहेर निघणाऱ्या लोकांसाठी चांदिवली फार्म रोड हा एकमेव पर्याय आहे. मात्र या रस्त्यावर वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी वाहतूक पोलीस तैनात नसल्याने वाहनचालक हवी तशी गाडी चालवत असतात, त्यामुळे तिढा निर्माण होवून वाहतूक कोंडी निर्माण होत असते. नहारकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस अनेक ठिकाणी वाहने उभी करून वाहनचालक निघून जातात, त्यामुळे आधीच छोटासा असणाऱ्या रस्त्यावर वाहनांची कोंडी होत असते. नो पार्किंगचे बोर्ड वाहतूक पोलिसांनी या भागात लावले तर आहेत मात्र पार्क करणाऱ्या वाहनावर कारवाई करताना वाहतूक पोलीस कधीच आढळून येत नाही. असे याबाबत बोलताना काही नागरिकांनी सांगितले.
‘आम्ही साकीनाका वाहतूक विभागाला सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या काळात येथे वाहतूक पोलीस तैनात करण्याची मागणी केली असता, आमच्याकडे संख्याबळ कमी आहे. तुम्ही वाहतूक कोंडी रोखायची असेल तर आम्हाला १० ट्राफिक वॉर्डन द्या असे आम्हाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी सांगितले, असे याबाबत बोलताना मनदीप सिंग यांनी सांगितले.
पालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या अनेक समस्या आमच्या परिसरात आहेत मात्र पाठीमागील १० वर्षांपासून बृहनमुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) आमच्या समस्येकडे साफ दुर्लक्ष केले आहे. वर्षातून ४ ते ५ वेळा विविध कामासाठी रस्ते खोदले जातात ज्यामुळे आधीच निमुळत्या रस्त्यावर वाहतूकीचा मोठा भार पडून वाहतूक कोंडी होते. वाईन शॉपवर अनेक नागरिक मद्य खरेदी करून येथेच रस्त्याच्या किनाऱ्यावर पीत असतात, ज्यामुळे महिला आणि लहान मुलांना रात्री घराबाहेर पडणे धोकादायक ठरते, असेही काही नागरिकांनी सांगितले.
टाटा सिम्फनीचे रहिवासी सती सुरेश म्हणाले की, ‘हॉकर्स सहकार्य करायला तयार आहेत. मात्र इतर ठिकाणी पालिकेने कारवाई करून अतिक्रमण हटवावे अशी आमची मागणी आहे.’
‘सकाळी ९.३० वाजता ऑफिसला जाण्यासाठी आम्हाला ७ वाजता घरातून निघावे लागते. सकाळी अर्धा किलोमीटरचा रस्ता पार करण्यासाठी आम्हाला जवळपास एक ते दीड तासाचा कालावधी लागतो. आपत्कालीन परिस्थितीत अॅम्बुलन्स किंवा फायरइंजिन या वाहतूक कोंडीत अडकले तर किती जीवांना मुकावे लागेल हे सांगता येणेच कठीण आहे’ असेही स्थानिक नागरिक म्हणाले.
फक्त निषेध मोर्चा काढून आम्ही गप्प बसणार नाही. आमच्या समस्यांचे निराकरण नाही झाल्यास लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आणि पुढील काळात समस्यांचे निवारण होई पर्यंत आम्ही “नोटा”चा उपयोग करू असा इशाराही चांदिवलीकरांनी यावेळी दिला.
No comments yet.