जगभरात थैमान घातलेला कोरोना वायरसला रोखण्यासाठी उत्सव आणि सण घरीच साजरे करण्याची विनंती प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. याचीच दक्षता घेत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वी जयंती आंबेडकरी अनुयायांनी सरकारी आदेशाचे पालन करीत घरीच राहून साजरी केली. जागर मानवतेचा (सुरुवात एका नव्या पर्वाची) या समुहातर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त डिजिटल पध्दतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
समुहातर्फे १४ एप्रिलला दिवसभर चित्रकला, काव्य लेखन, लेख लेखन, वक्तृत्व अशा विविध स्पर्धांचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने केले होते. या सर्व स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात स्पर्धक सहभागी झाले होते. अत्यंत पारदर्शक पध्दतीने त्याचे परीक्षण करून १९ एप्रिलला या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. विजेत्या १७ स्पर्धकांना ई-सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले तर सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जागर मानवतेचा समुहाने अशाप्रकारे महापुरुषांचे विचार जनमानसात रुजविण्यासाठी घरीच राहून डिजिटल भिमजयंती साजरी केली. या सर्व स्पर्धेचे नियोजन व आयोजन बुद्धराज गवळी, प्रतिक कांबळे, महेश सावंत, स्वप्निल शिरसाठ यांनी केले.
No comments yet.