पवईतील साकीविहार रोडवर लार्सन एंड टूब्रो कंपनीसमोर असणाऱ्या साई ऑटो हुंडाई सर्व्हिस सेंटरला आग लागल्याची घटना आज, गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने वेळीच कर्मचाऱ्यांना बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली. आगीची घटना एवढी भयानक होती कि संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते. अग्निशमन दलाच्या १० बंब आणि फायर इंजिन कर्मचाऱ्यांच्या मदतीने जवळपास २ तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
आगीची तीव्रता आणि येणारे धुरांचे लोट पाहून लागूनच असणाऱ्या महावीर क्लासिक या इमारतीत राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पवई पोलीस, एनएसजी कमांडो आणि स्थानिक नागरिक यांच्या मदतीने त्वरित इमारत रिकामी करून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
सर्विस सेंटर असल्याने आतील भागात ऑईल व इतर ज्वलनशील पदार्थ असतात त्यांनी आग पकडल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यास वेळ लागत असल्याचे यावेळी बोलताना अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.
“आगीच्या ठिकाणावरुन स्फोटाचे मोठे – मोठे आवाज येत होते. सोबतच आगीचे आणि धुरांचे लोळ सभोवतालच्या परिसरात पसरले असल्याने रहिवाशी चांगलेच घाबरले होते. सुरक्षा भिंतीला लागूनच हे सेंटर असल्याने आणि आगीचे लोळ दूरवर जवळपास २० ते ३० फुट उंचावर जाताना दिसून येत होते. यामुळे इमारतीकडे ही आग पसरण्याची भीती सुद्धा होती,” असे याबाबत बोलताना स्थानिक नागरिकांनी सांगितले.
आगीच्या घटनेमुळे नागरिकांची प्रचंड गर्दी रस्त्यावर निर्माण झाल्याने काही काळ वाहतूक मंदावली होती. सेंटरच्या आतमध्ये बऱ्याच गाड्या होत्या त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. तरीही काही गाड्या आणि गाड्यांचे पार्ट या आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याची शक्यता आहे. याबाबत संबंधितांकडून आम्ही माहिती मिळवत आहोत,” असे यासंदर्भात बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
आगीची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही घटनास्थळी पोहोचत परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, आगीत किती नुकसान झाले आहे याची अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. तसेच आगीचे नक्की कारणही समोर आले नसून, त्याबाबत तपास सुरु असल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.
No comments yet.