वन्यजीवांबाबत कोणतीही अनधिकृत कृती आम्ही कदापी सहन करणार नाही – सुनिष कुंजु
महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारितील महसूल व वन विभाग यांनी प्राणीमित्र, वन्यप्राणी व पर्यावरण संरक्षण कार्यकर्ते सुनिष सुब्रमण्यन कुंजु यांची मानद वन्यजीव रक्षक, मुंबई उपनगर या पदी निवड केली आहे. ही त्यांची दुसऱ्यांदा निवड असून, यापूर्वी त्यांची मानद वन्यजीव रक्षक मुंबई शहर म्हणून निवड करण्यात आली होती.
कुंजु हे प्लांट अँड अॅनिमल वेलफेअर सोसायटी – मुंबईचे (पॉज-मुंबई) संस्थापक – सचिव आहेत. तर अम्मा केअर फाऊंडेशनचे (एसीएफ) सहसंस्थापक आहेत. सोबतच ते मुंबई आणि आसपासच्या परिसरातील प्राणी, वनस्पती संवर्धनासाठी आणि विकासासाठी दोन दशकापासून काम करत आहेत. त्यांनी आपल्या टीमच्या साहाय्याने आज रोजी पर्यंत अनेक वन्यजीवांची सुटका केलेली आहे. सोबतच जनसामान्यांमध्ये वन्यजीवांबद्दल जनजागरूकता, वन्यजीव व्यापार प्रतिबंधित कारवाई, वृक्षारोपण आणि संवर्धनाच्या कामांमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे.
सोशल मीडियाद्वारे चालू असलेले ऑनलाईन अनधिकृत वन्यजीव व्यापार, अवैध बाजारपेठा आणि पाळीव प्राण्यांच्या दुकानात सुरु असणारी वन्यजीव व्यापाराची माहिती मिळवत वन्यजीव विभाग, वन विभाग, वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्यूरो आणि पोलिस सारख्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणाच्या मदतीने असंख्य वन्यजीवांची सुटका करून त्यांना निसर्गवासात मुक्त केले आहे. जखमी, अशक्त वन्यजीवांचा ताबा हा वैद्यकीय देखभालीसाठी मिळवून सदर वन्यजीवांना तंदुरुस्त करून निसर्गवासात मुक्त करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना सुनिष कुंजु म्हणाले की, “कोणतीही मोहिम यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग आणि जनजागरूकता खूप महत्वाची आहे. वन्यजीवांबाबत कोणत्याही प्रकारची अनधिकृत कृती आम्ही कदापिही सहन करणार नाही.”
बऱ्याच वेळेस काही मान्यवर, सेलिब्रिटी वन्यजीवांसह स्टंट करताना दिसतात. सोशल मीडियावर याबाबतचे फोटो, व्हिडीओ टाकले जातात. अश्या प्रकारची कृती ही वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२; परफॉर्मिंग अॅनिमल (नोंदणी) नियम, २००१ आणि पशु क्रूरता निवारण अधिनियम १९६०चे उल्लंघन करणारी असून शिक्षेस पात्र आहे.
सुनिष कुंजु यांनी श्रीमती मेनका गांधी यांच्या पीपल फॉर अॅनिमल्स, दिल्ली या संस्थेमध्ये किशोरवयीन असल्यापासूनच सदस्य म्हणून आदर्शवत कार्य केले आहे. या अनुभवातुन कुंजु यांनी सन २००२मध्ये पॉज-मुंबई या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. भारतीय पशु कल्याण मंडळ, वन्यजीव गुन्हेगारी नियंत्रण ब्यूरो आणि महाराष्ट्रातील पशु कल्याण कायदा देखरेख समिती अशा विविध सरकारी संस्थांशी त्यांचा संबंध आहे.
वन्यजीव, पाळीव प्राणी आणि भटक्या प्राण्यांसाठी आपत्कालीन परिस्थितीत पोलिस, अग्निशमन दल, महानगरपालिका आणि इतर संस्थांशी मदत आणि समन्वय साधण्यामध्ये कुंजु आणि टीम पूर्णपणे सक्रिय आहे. या संयुक्त उपक्रमातून संस्थेतर्फे आजवर मौल्यवान, भरीव कार्य झालेले आहे.
नष्ट होत चाललेल्या चिमणी या पक्षाचा अनधिकृत व्यापार कुंजू यांनी उघडकीस आणून बंद केला आहे. हत्ती या प्राण्याचा वापर करून भीक मागण्याचा प्रकारावर बंदी घालण्यासाठी पुढाकार घेऊन यशस्वी मोहीम राबविली आहे. कुंजु यांनी विशेष प्रयत्नाने सुरु केलेली भारत सरकारच्या सीमाशुल्क विभागात गुन्हाचा तपास करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विशेष कुत्र्याला (स्निफर डॉग) सेवानिवृत्ती नंतर दत्तक देण्याची परंपरा आता इतर विभागातही राबवली जाते.
मुंबईतील पवई तलावाचे सुशोभीकरण करताना तलावाच्या सभोवतालच्या झाडांच्या संवर्धनासाठी त्यांनी विशेष मोहीम राबविली होती. तसेच तलावात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर हरकत घेऊन हे थांबविण्यात त्यांची संस्था यशस्वी झालेली आहे.
बिबट्याला बऱ्याच वेळेस नरभक्षक ठरवून अडकवले जाते, कायमस्वरूपी पिंजऱ्यात ठेवले जाते. यातील मेख ओळखुन सुनिष कुंजु यांनी बिबट्यांच्या हक्कांसाठी आवाज उठविला. ज्या बिबट्याला नरभक्षक म्हणून तुरूंगात डांबले जाते त्याची डीएनएचाचणी करण्याची मागणी केली.
वन्यजीव शिकार, तस्करी, अनधिकृत व्यापार तसेच प्राण्यावरील अत्याचार अश्या कुठल्याही स्वरूपाची माहिती देण्यासाठी एसीएफ पॉज – मुंबई हेल्पलाईन नंबर 9833480388 वर संपर्क साधावा असे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले.
No comments yet.