स्थानिक नगरसेविका चित्रा सोमनाथ सांगळे यांच्या प्रयत्नातून लवकरच चांदिवलीत सुसज्ज असे प्रसूतिगृह आणि दवाखाना पालिकेच्या माध्यमातून उभे राहणार आहे. हे प्रसूतिगृह चांदिवली म्हाडा परिसरातील आरक्षित भूखंडावर उभे राहणार असून, यासाठी १० कोटी ७१ लाख रुपये खर्च येणार असल्याचा अंदाज आहे. सदर कामाचा शुभारंभ फेब्रुवारी महिन्यात करण्यात येणार आहे. पुढील अडीच वर्षात नागरिकांच्या सेवेसाठी हे प्रसूतिगृह खुले होईल. चांदिवली , साकीनाका, पवई परिसरातील लोकांना याचा फायदा होणार आहे.
चांदीवली विधानसभा क्षेत्रात पाठीमागील काही वर्षांत मोठ्या झपाट्याने लोकवस्ती वाढली आहे. या भागाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असतानाच महानगरपालिकेच्या सेवा सुविधांवर प्रचंड ताण पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण वाढत असल्याचे पाहता स्थानिक नगरसेविका चित्रा सांगळे यांनी येथील लाखो नागरिकांना महानगरपालिकेची आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पाठीमागील ३ वर्षापासून प्रयत्न करत आहेत.
चांदिवलीत एक सुसज्ज असे प्रसूतिगृह व नागरिकांसाठी पालिकेचा दवाखाना असावा ही येथील नागरिकांची मागणी पाहता सांगळे यांनी पालिका सभागृहात आवाज उठवला होता. अखेर महापालिकेने म्हाडा कॉलनी येथील राखीव भूखंडावर प्रसूतिगृह व दवाखाना उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, कंत्राटदाराचीही नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे. पालिकेने या कामासाठी १२ कोटी १७ लाख ५१ हजार रुपयाचे अंदाजपत्रक तयार केले होते. मात्र, पालिकेने तयार केलेल्या खर्चाच्या अंदाजपत्रकापेक्षा १२ टक्के कमी दराने कंत्राटदाराने कंत्राट भरल्याने पालिकेचे दीड कोटी रुपये सुद्धा येथे वाचणार आहेत.
“मंगळवारी, १४ जानेवारीला या कामाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मंजुरीसाठी मांडण्यात आला होता, तो मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता कधीही या प्रसुतिगृहाच्या कामाची सुरुवात होऊ शकते,” असे आवर्तन पवईशी बोलताना नगरसेविका चित्रा सांगळे यांनी सांगितले.
No comments yet.