जवळपास १२ वर्ष दुरावस्थेत असणाऱ्या हिरानंदानी –विक्रोळी लिंक रोडला आता नवसंजीवनी मिळणार आहे. याच्या कामाचा भूमिपूजन कार्यक्रम रविवारी आमदार आर. एन. सिंह (विपस) यांच्या हस्ते आणि अनेक पवईकर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
हिरानंदानी–विक्रोळी लिंक रोडसाठी विधान परिषद सदस्य आमदार आर. एन. सिंह यांच्या प्रयत्नातून आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत १० लाख रुपयांचा फंड मंजूर करण्यात आला आहे. यामुळे गेली अनेक वर्ष दुर्दशा झाल्याने शेवटचा श्वास घेत असलेला हा रोड आता बनवला जाणार आहे. या रोडच्या कामाचा शुभारंभ म्हणून रविवारी भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता.
यावेळी राजकीय, सामाजिक, पत्रकारिता, औद्योगिक अशा विविध माध्यमातील मान्यवर उपस्थित होते. मात्र, या सर्वात मुख्य आकर्षण होते ते या मार्गाने दररोज हजारो प्रवाश्यांना घेवून येणारे आणि घेवून जाणारे रिक्षा चालक.
विक्रोळी स्टेशनपासून अनेक प्रवासी रिक्षाच्या माध्यमातून प्रवास करतात. मात्र खराब रस्त्यामुळे रिक्षांचे नुकसान होत असल्याने त्यांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत होता. यासाठी पावसाळ्यात रिक्षा चालकांनी या रस्त्याची डागडुजी सुद्धा करून घेतली होती. मात्र, त्याचा फारसा उपयोग होत नव्हता, गरज होती ती रस्ता पुनर्निर्मितीची. याची बाब लक्षात घेवून रिक्षाचालक प्रतिनिधींच्या हस्ते सुद्धा या वेळी कामाचा नारळ फोडण्यात आला.
वाहतूक व्यवस्थेची वाहतूक पोलिसांच्या मदतीने तरतूद करून लवकरच या रोडच्या कामाची सुरुवात केली जाणार असल्याचे यावेळी बोलताना जनसंपर्क प्रतिनिधींनी सांगितले.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.