घरकामासाठी असणाऱ्या महिलेवर विश्वास ठेवून तिच्या ताब्यात घर सोपवणे पवईकराला चांगलेच महागात पडले आहे. घरकाम करण्याच्या बहाण्याने या महिलेने घरातील अंदाजे ५.८९ लाखाच्या दागिन्यांवर डल्ला मारला. पवईतील रहेजा विहारमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०६ नुसार गुन्हा नोंद करत महिलेला अटक केली आहे.
पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहेजा विस्टा इमारतीत १२व्या मजल्यावर राहणाऱ्या गुप्ता (बदललेले नाव) कुटुंबाच्या घरी तुंगागाव येथे राहणारी महिला नामे सुलताना लालू शेख ही पाठीमागील साडेतीन वर्षापासून काम करत आहे.
शेख या घरात बरेच दिवस काम करत असल्याने तिने गुप्ता कुटुंबियांचा विश्वास संपादन करून घेतला होता. त्यांच्या गैरहजेरीत देखील ती येऊन घरातील कामे करून निघून जात असे.
१९ जुलैला गुप्ता यांना कार्यक्रमात घालण्यासाठी काही दागिने आवश्यक असल्याने ते घेण्यासाठी त्या कपाटात पाहत असताना त्यांना कपाटात ठेवलेले त्यांचे काही दागिने आणि रोख रक्कम गायब असल्याचे लक्षात आले.
“याबाबत त्यांनी घरात इतर व्यक्तीकडे याबाबत चौकशी केली, मात्र कोणीच ते घेतले नसल्याचे सांगितले.” असे पवई पोलिसांनी सांगितले.
ज्यामुळे यासंदर्भात गुप्ता यांनी पवई पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद केला.
“तपासा दरम्यान आम्ही इतर लोकांसोबतच सदर ठिकाणी घरकाम करणाऱ्या महिलेकडे कसून चौकशी केली असता तिने हे दागिने गुप्ता यांच्या घरात त्यांच्या गैरहजेरीत घुसून चोरी केल्याची कबुली दिली.” असेही पोलीस म्हणाले.
भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०६ नुसार गुन्हा नोंद करत पवई पोलिसांनी सुलताना लालू शेख हिला अटक केली आहे. “तिच्याकडून चोरीस गेलेले दागिने हस्तगत करण्याचे काम सुरु आहे,” असे यासंदर्भात बोलताना तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन यादव यांनी सांगितले.
No comments yet.