लेक होम परिसरात दिसला बिबट्या

bibtya

प्रातिनिधिक छायाचित्र (विकीपेडिया)

वई मधील लेकहोम परिसराच्या पाठीमागील झाडीत सोमवारी संध्याकाळी काही रहिवाशांना बिबट्या फिरताना आढळून आला आहे. यासंदर्भात सोसायटीतर्फे रहिवाशांना सूचनापत्र देवून सूचित करण्यात आले असून, वन अधिकाऱ्यांनी मंगळवारी परिसराची पाहणी करून रहिवाशांना खबरदारी बाळगण्यास सूचना केल्या आहेत. बिबट्याच्या वावरामुळे रहिवाशांना मात्र धडकी भरली आहे.

लेकहोम, लेक लुक्रेन सोसायटीच्या आवारात खेळत असणाऱ्या काही मुलांना सोमवारी संध्याकाळी सोसायटी, रहेजा नेस्ट व आयआरबी यांच्यामधील झाडीत बिबट्या फिरत असल्याचे आढळून आले आहे. याबाबत त्यांनी सोसायटी प्रशासनाला सूचित केल्यानंतर, सोसायटीतर्फे रहिवाशांना सूचनापत्रक काढून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत आवर्तन पवईशी बोलताना सोसायटी पदाधिकारी घोष यांनी बातमीला दुजोरा देत सांगितले, “सोसायटी तर्फे अपार्टमेंट अड्डाच्या माध्यमातून सर्व रहिवाशांना या संदर्भात सूचित केले गेले आहे. सोसायटी तर्फे संपूर्ण खबरदारी घेतली जात आहे.”

“परिसरात फिरणारा बिबट्या हा केवळ खाली मैदानात खेळणाऱ्या मुलांनीच नव्हे, तर घरांच्या बाल्कनीतून, खिडकीतून सुद्धा काही तरुणांनी पाहिला आहे. त्यामुळे निष्काळजीपणा न-बाळगता उपाययोजना करणेच योग्य आहे” असे अजून एका पदाधिकाऱ्याने या संदर्भात बोलताना सांगितले.

ते पुढे म्हणाले, “वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी संध्याकाळी येऊन पाहणी केली आहे. जोरदार पावसामुळे बिबट्याच्या पावलांचे ठसे मिळून आले नाहीत. त्यांनी सोसायटीच्या सुरक्षा भिंतीला कुंपण तयार करा, लहान मुलांना संध्याकाळी उशिरा खाली खेळण्यासाठी एकटे सोडू नका, मोठ्या विजेच्या दिव्यांची सोय करा, अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत.

बिबट्याच्या वावर असल्याच्या बातमीने रहिवाशांना मात्र धडकीच बसली असून, सोसायटीतर्फे रहिवाशांना ईमेल करून सूचना दिल्या जात आहेत, तसेच वनाधिकारी गुरुवारी पुन्हा पाहणी आणि तपास करण्याकरता येणार असल्याचेही याच माध्यमातून सांगितले जात आहे.

प्राणीमित्र आणि पॉज मुंबई संस्थेचे सुनिश कुंजू यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले, “पाठीमागच्या वर्षी सुप्रीम पार्कच्या पाठीमागील जंगलात दिसणारा बिबट्या, त्याच्या आधी लेकहोमच्या बाजूच्या छोट्या जंगलात दिसल्याची माहिती काही लोकांनी दिली होती. एवढे दिवस गायब असणारा बिबट्या काही महिन्यापूर्वी सुप्रीम पार्कच्या जवळील जंगलात पुन्हा दिसत असल्याचे आम्हाला कळवण्यात आले होते. एवढा काळ त्या परिसरात असणाऱ्या बिबट्याला तिथे उपलब्ध असणारी शिकार किती काळ पुरणार? त्यामुळे शिकारीच्या शोधत बाहेर निघालेला बिबट्या लेकहोम परिसरात फिरताना आढळून आल्याची शक्यता नाकारता येत नाही.”

ते पुढे म्हणाले, “कधी कधी काही हौशी लोक आपल्या कुत्र्यांना वाघाच्या रंगाचे पट्टे मारतात, लांबून पाहिल्यावर तो वाघच असल्यासारखे वाटते. त्यामुळे असे कोणते तरी जनावर लांबून पाहून सुद्धा लोकांच्यात गफलत झाली असू शकते. वनविभागाच्या शोध मोहिमेनंतर किंवा बिबट्याचा वावर असल्याचे पुरावे हाती लागल्याशिवाय खरी परिस्थिती समोर येणे अशक्य आहे.

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!