जेवीएलआर मार्गावरील पहिले शौचालय जनतेसाठी खुले

रविराज शिंदे
toilet iit market

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर बनवण्यात येणाऱ्या चार शौचालयांपैकी, आयआयटी मार्केट येथे पहिले शौचालय बनवण्यात आले आहे. या शौचालयाचे उद्घाटन रविवारी स्थानिक नगरसेवक चंदन शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले असून, मंजुरीनंतर एक वर्षानंतर अखेर आता ते जनतेसाठी खुले करण्यात आले आहे. पुढील दोन महिन्यात उरलेल्या शौचालयांचे काम पूर्ण करून ती जनतेसाठी खुली केली जाणार आहेत.

जेव्हीएलआर मार्गाच्या निर्मितीच्या दरम्यान गांधीनगर ते आंबेडकर उद्यान या पवईतील भागात एकही शौचालय बनवले गेले नसल्याने, या मार्गावरील प्रवाश्यांची गैरसोय होत होती. याबद्दल पवईकरांकडून वारंवार पत्रव्यवहार, पाठपुरावा करूनही प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याने पवईकरांकडून १६ मार्च २०१५ रोजी ‘मुतारी बनाव आंदोलन’ करण्यात आले.

अनेक खटाटोपानंतर अखेर जुलै २०१५ रोजी पवईच्या हद्दीत आयआयटी मेन गेट, आयआयटी मार्केट गेट आणि गणेश विसर्जन घाट अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणी कंटेनर पध्दतीचे शौचालय मंजूर करण्यात आले. मात्र, सांडपाणी आणि मलबा वाहिनीच्या मंजुरीवरून काम रखडत अखेर ते पूर्ण होण्यास एक वर्षाचा काळ लोटावा लागला.

रविवारी स्थानिक नगरसेवक चंदन शर्मा यांच्या हस्ते आयआयटी मार्केट गेट येथे बनवण्यात आलेल्या पहिल्या शौचालयाचे उद्घाटन स्थानिक नागरिक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.

“जेवीएलआरच्या निर्मितीपासूनच चंदन शर्मा हे शौचालयाच्या मंजुरीसाठी काम करत होते. मात्र, मंजुरी मिळण्यास थोडा उशीर झाल्याने काम रखडले गेले. आता कामाला गती मिळाली असून, येत्या काही महिन्यातच सर्व शौचालये बांधून जनतेसाठी खुली करण्यात येतील”, असे आवर्तन पवईशी बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

“या मार्गावर स्वच्छतागृहाची निकडीची गरज असतानाही, ते बनवले जात नसल्याने पवईकरांना आंदोलन करणे भाग पडले. श्रेय घेण्यासाठी नाही, तर जनतेचा प्रश्न सोडवला जावा म्हणून पवईकरांकडून हे आंदोलन केले गेले होते. मात्र, उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस वार्ड क्रमांक ११५ अध्यक्ष अण्णा घाडगे यांनी तोंडाला काळे फासण्याचे वक्तव्य करून पवईकरांचा अपमान केला आहे. ज्यासाठी त्यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे”, असे यासाठी आंदोलन केलेल्या आंदोलकांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!