पवईतील एका उच्चभ्रू इमारतीत घुसत चोरट्यांनी दिवसाढवळ्या चोरी केल्याची घटना सोमवारी घडली आहे. विशेष म्हणजे आपली ओळख लपवण्यासाठी चोरट्यांनी आपल्या चेहऱ्यावर मास्क लावत इमारतीत प्रवेश करून फ्लॅट फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लांबवली.
पाठीमागील काही दिवसांपासून पवईतील विविध भागात चोरीच्या काही घटना वाढलेल्या असून, अशीच एक धक्कादायक घटना पाठीमागील सोमवारी पवई परिसरात उघडकीस आली आहे. पवईतील राज ग्राइंडर इमारतीत सुरक्षा व्यवस्थेला भेदत मास्क घालून आलेल्या २ व्यक्तींनी घर फोडत ३ लाखाच्या सोन्याच्या दागिन्या आणि रोख रकमेवर हात साफ केला आहे.
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या १८व्या मजल्यावर राहणारे चौधरी कुटुंब (बदलेले नाव) सोमवारी कामानिमित्त बाहेर गेले होते. संध्याकाळी आपले काम संपवून घरी आले असता त्यांच्या घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले त्यांना आढळून आले. संशय आल्याने त्यांनी घरातील कपाटे तपासून पाहिले असता त्यात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अशी अंदाजे ३ लाखाची चोरी झाल्याची चौधरी यांच्या लक्षात आले.
यासंदर्भात पवई पोलीस भारतीय न्याय संहिताचे कलम ३०३ (५) अंतर्गत गुन्हा नोंद करून तपास करत आहेत.
“आम्ही इमारतीमधील आणि परिसरातले सीसीटीव्ही फुटेज तपासत चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. २ संशयित इसम चेहऱ्यावर मास्क घालून इमारतीत प्रवेश करताना दिसून येत आहेत. त्यांची ओळख पटली असून, लवकरच चोर पोलीस कोठडीत असतील,” असे यासंदर्भात बोलताना पवई पोलिसांच्या तपासी अधिकाऱ्याने आवर्तन पवईला सांगितले.
ते पुढे म्हणाले, “संशयित चोरट्यांनी पवईच्या आसपासच्या परिसरात देखील चोरी केल्याचे समोर आले आहे. त्या अनुषंगाने आम्ही त्या परिसरातील पोलिसांच्या मदतीने अधिक माहिती मिळवत आहोत.”
पवईतील मॉलमध्ये फिरत होते चोर
“या घटनेतील संशयित चोर हे हिरानंदानी येथील एका मॉलमध्ये फिरत असल्याचे देखील आढळून आले आहे. ते या ठिकाणी आपल्या पुढील चोरीच्या रेकीसाठी आले होते कि खरेदीसाठी याची देखील आम्ही माहिती मिळवत आहोत. ज्यामुळे त्यांची ओळख पटणे सोपे होईल,” असे पवई पोलिसांनी सांगितले.
No comments yet.