पवई परिसरातील शिवशक्ती नगर येथील एका साडीच्या दुकानात घुसून बंदुकीचा धाक दाखवून, दुकान मालकाला चाकूने जखमी करून जबरी चोरी करणाऱ्या ४ आरोपींना पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. गुन्ह्यातील मुख्य आरोपीला काही महिन्यांपूर्वीच जामिनावर सोडण्यात आले होते. तो खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होता.
२१ एप्रिलला ४ अज्ञात इसम हे फिर्यादी किशोर व्यास (५५) यांच्या पवईतील शिवशक्ती नगर येथील साडीच्या दुकानात घुसले. त्यातील एकाने त्यांना रिव्हॉल्वर दाखवत धमकावले. व्यास यांनी विरोध करताच त्यातील एकाने चाकूने त्यांच्या पोटावर वार करून त्यांना जखमी केले. मात्र दुकानात जास्त रोकड न मिळाल्याने चांदीचा शिक्का, मोबाईल आणि ३००० रुपये रोकड घेवून त्यांनी पळ काढला.
व्यास यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांनी दिलेल्या जवाबावरून पवई पोलिसांनी हत्याराचा धाक दाखवून आणि जखमी करून केलेल्या जबरी चोरीबाबत भादंवि कलम ३९७, ४५२; भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ सह मपोका ३७ (१) (अ), १३५ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरु केला होता.
“आरोपींनी कुठलेही पुरावे मागे ठेवले नव्हते. परिसरात आणि त्यांच्या जाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आमच्या पथकाने ते आलेल्या कॅब आणि गेलेल्या रिक्षाचा नंबर मिळवला होता. माहितीच्या आधारावर गाड्यांना ट्रेस करून आरोपींचे वर्णन मिळवले,” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे यांनी सांगितले.
पोलिसांनी ठाणे येथून कॅब आणि भांडूप येथून रिक्षा चालक याला ताब्यात घेवून चौकशी केली असता, कॅब बुक करण्यासाठी आरोपीने वापरलेला मोबाईल नंबर आणि त्यांना सोडल्याचे ठिकाण पोलिसांना प्राप्त झाले होते. आरोपी हे विरार भागातून आल्याचे समोर आले होते.
“मुंबई, ठाणे सह विरार भागात आरोपींचा संबंध असल्याचे मिळून आले होते. त्या अनुषंगाने विविध पथके बनवून सर्व परिसरात तपास सुरु केला होता. तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांना सुद्धा ताब्यात घेवून चौकशी सुरु होती.” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
तांत्रिक आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पवई पोलिसांनी विरार येथून आरोपींना अटक केली. अटक आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याचे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.
“यातील मुख्य आरोपीला ४ महिन्यापूर्वी जामिनावर सोडण्यात आले होते. तो खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होता,” असेही यावेळी बोलताना पोलीस सूत्रांनी सांगितले.
पोलीस उपायुक्त परिमंडळ १० पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त दिनेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिलीप धामुनसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महामुनी, पोलीस उपनिरीक्षक अनिल पठारे, पोलीस उपनिरीक्षक मोहिते, पोलीस उपनिरीक्षक पगारे, पोलीस उपनिरीक्षक आचरेकर, पो.ह. संतोष देसाई, संतोष पालांडे, दामू मोहोळ, पो. ना. बाबू येडगे, शिशुपाल जगधने, नितीन खैरमोडे, ब्रिजेश पवार, जगताप, सचिन गलांडे, प्रमोद जाधव, पोलीस शिपाई अभिजित जाधव, कदम, देशमुख, सुनील मसुगडे, गणेश कट्टे, उज्वल पाटील यांनी गुन्हा उघडकीस आणला.
No comments yet.