पवई पोलिसांच्या हद्दीत एका ३० ते ३५ वर्षीय पुरुषाचे शव शुक्रवारी बेवारस अवस्थेत मिळून आले असून, त्या तरुणाचा खून झाला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पवई पोलीस भादवि कलम ३०२ नुसार गुन्हा नोंद करून अधिक तपास करत आहेत.
या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पवई पोलिसांना आयआयटी मार्केट जवळील फुलेनगर परिसरातील डोंगराळ भागात एका तरुणाचे शव कुजलेल्या अवस्थेत पडले असल्याची माहिती प्राप्त झाली होती. “माहितीच्या आधारे आम्ही घटनास्थळी धाव घेत शव राजावाडी येथे शवविच्छेदनासाठी पाठवत एडीआर नोंद करून सदर व्यक्तीची माहिती मिळवण्याचे कार्य सुरु केले होते,” असे पवई पोलिसांनी सांगितले.
“मृताच्या छातीच्या बाजूला भोकसल्याची जखम असल्याचे समोर आले आहे. कोणीतरी खून करून त्या ठिकाणी शव आणून टाकले असावे किंवा तिथे आणून त्याचा खून केला असावा,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
“मृताची ओळख अजून पटली नसून, आसपासच्या परिसरातून तशा वर्णनांची व्यक्ती हरवल्याच्या तक्रारी बद्दल माहिती मिळवण्यात आली आहे. मृत व्यक्तीच्या वर्णनाशी मिळत्याजुळत्या वर्णनाची व्यक्ती भांडूप परिसरातून हरवली असल्याची तक्रार भांडूप पोलीस ठाण्यात नोंद असून, आम्ही त्या व्यक्तीच्या परिवाराला रविवारी सकाळी ९ वाजता बोलावले आहे.” असेही याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
नवनियुक्त पोलीस उपायुक्त रेड्डी यांनी शनिवारी पवई पोलीस ठाण्यास भेट देऊन गुन्ह्याची माहिती घेत गुन्ह्याच्या तपासासंदर्भात काही मार्गदर्शक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. सोबतच गुन्हे शाखा सुद्धा या गुन्ह्याचा समांतर तपास करत आहे.
No comments yet.