पालिकेचा अजब कारभार; नो डांबर.. नो काँक्रिट.. वेस्ट मटेरियल टाकून भरले खड्डे

पावसाच्या हजेरीत मुंबईत पडलेल्या खड्डयांमुळे एकंदरीत पालिका कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतर ऍक्शन मोडवर असलेल्या पालिका आयुक्तांच्या निर्देशाला सहाय्यक अभियंत्यांनीच उघड्यावर सोडल्याचे चित्र समोर आले आहे. पवईतील आयआयटी भागात पडलेल्या खड्यांवर पालिकेने वेस्ट मटेरियल टाकून खड्डे भरण्याची अजब युक्ती लढवत लोकांच्या जीवाशी खेळ केला आहे.

मुंबईत पाठीमागील काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे प्रत्येक वर्षी प्रमाणेच रस्ते धुवून जात रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. २७३ कोटी खर्चूनही रस्ते खड्ड्यांतच राहिल्याने या खड्ड्यांमधील रस्त्यातून प्रवास करताना दररोज चाकरमानी आणि शाळकरी विद्यार्थांचे हाल होत आहेत.

मुंबई महानगर पालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या सर्व रस्त्यांवर मिळून ८०२ खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात होणाऱ्या रस्त्यांच्या चाळणीकडे पाहता स्वतः पालिका आयुक्त यांनी मुंबईच्या रस्त्यावर खड्डा दिसल्यास त्वरित भरा असे आदेश दिले आहेत. यासाठी २४ विभागातील सहाय्यक रस्ते अभियंत्यांना याची जबाबदारी सोपवली आहे.

थेट पालिका आयुक्तांनी आदेश देत सर्व सहायक आयुक्तांना खड्ड्यांबद्दल सक्त कारवाईचे निर्देश दिले आहेत. लवकरात लवकर सहाय्यक अभियंता यांच्याकडून अहवाल मागवत खड्डे बुजवण्याचे निर्देश दिले आहेत. आयुक्तांच्या या आदेशाचे पालन करताना पालिका ‘एस’ विभागातील अभियंत्यांनी एक चांगलीच शक्कल लढवली आहे. मात्र ही शक्कल लढवत पवई आयआयटी मार्केट भागात पालिकेकडून खड्डे बुजवण्याच्या कामातच निष्काळजीपणा आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ केल्याचा प्रकार समोर आला आहे.

रस्त्यावरील खड्डे बुजवताना पालिकेने ना डांबर, ना काँक्रिट वापरता चक्क वेस्ट मटेरियलने खड्डे बुजविण्याचे काम केल्याचे बघून पवईकरांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. पालिकेच्या या निष्काळजी आणि लोकांच्या जीवाशी चालू असलेल्या खेळाबद्दल पवईकरांनी पालिका ‘एस’ विभागा विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. खड्डे बुजविण्याची ही कसली पद्धत? असा प्रश्न स्थानिक रहिवाशांनी उपस्थित केला आहे.

“रस्त्यावर वेस्ट मटेरियल टाकल्याने या भागातील समतोल बिघडला आहे. खड्डेही व्यवस्थित भरले जात नाहीयेत. या बाहेर निघालेल्या मटेरीअलला धडकून विद्यार्थी पडून अपघात होण्याची शक्यता आहे.” असे यासंदर्भात बोलताना पवईकरांनी सांगितले.

याबाबत पालिका एस विभागाच्या सहाय्यक अभियंत्यांना विचारले असता, त्यांनी कंत्राटदाराला धारेवर धरल्याचे कळते व तत्काळ प्रचलित नियमानुसार खड्डे बुजवले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

, , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!