वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणाऱ्या वायू आणि ध्वनी प्रदूषणात पवई दुसऱ्या स्थानावर असल्याचे नुकत्याच एका सर्वेक्षणातून समोर आले होते. मात्र आता यातील वाहतूक कोंडी या समस्येतून तरी हिरानंदानी लवकरच सुटणार आहे. येथील सेन्ट्रल एव्हेन्यू रोड आणि मेन स्ट्रीटला “नो पार्किंग झोन”घोषित करण्यात आले आहे. तसे संदेश देणारे फलकही ठिकठिकाणी लावण्यात आले असून, या रस्त्यांवर वाहने पार्क करणाऱ्यांवर आता वाहतूक पोलिसांतर्फे कारवाई करण्यात येणार आहे.
एस एम शेट्टी शाळा ते सायप्रेस या भागात वन-वे असल्याकारणाने हा भाग वगळता सायप्रेस सर्कल ते पवई प्लाझा हा सेन्ट्रल एव्हेन्यू रोडचा भाग आणि स्वामीनारायण चौक ते कंट्रोल रूम हा मेन स्ट्रीटच्या भागात ‘नो पार्किंग झोन’ असणार असून, कोणत्याही प्रकारची वाहन लावण्यास बंदी आहे.
सुरुवातील प्रायोगिक तत्वावर ही अंमलबजावणी होणार असून, समस्या कमी न-झाल्यास आवश्यक ते बदल करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागातर्फे सांगण्यात येत आहे.
जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडच्या (जेव्हीएलआर) निर्मितीमुळे मुंबई उपनगरात पूर्व आणि पश्चिम उपनगराना जोडणारा एक महत्वाचा दुवा मुंबईकरांना मिळाला आहे. या मार्गावरून दररोज या दोन्ही उपनगरात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांपैकी ६०% वाहतूक होत असते. त्यातच पवईतील हिरानंदानी परिसरात अनेक नामांकित कंपन्यांनी आपली कार्यालये थाटल्यामुळे दक्षिण मुंबईनंतर पवईला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले असून, मोठ्या प्रमाणात लोक येथे कामाच्या निमित्ताने प्रवास करत असतात.
वर्सोवा – घाटकोपर या मुंबईतील प्रथम मेट्रो प्रकल्पामुळे मुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या रेल्वेच्या पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे या दोन टोकांना तिने एकत्रित आणले आहे. मेट्रो मार्गे शहराच्या आणि शहराबाहेरच्या कानाकोपऱ्यातून येणारे लोक साकीनाका, चांदिवली मार्गे हिरानंदानीत येत असतात. त्यामुळे हिरानंदानीला असणारे सर्वच्या सर्व एक्झिट एंट्रीज जाम होऊ लागल्या आहेत.
“साकीनाकाकडून येणाऱ्या वाहनांसाठी हिरानंदानी मार्गे विक्रोळी, कांजूरमार्ग जाणारा रोड हा शॉर्टकट मार्ग आहे. जेव्हीएलआरवरून फिरून जाण्यापेक्षा इकडून येणारी वाहने आणि जाणारी वाहने ही सर्रास हिरानंदानी मार्गेच प्रवास करत असतात. त्यामुळे या परिसरात गेल्या काही महिन्यात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. वॉर्डन वाहतूक कोंडी रोखण्यासाठी सतत कार्यरत असतात मात्र, शॉर्टकट मार्गे प्रवास करणारा एवढा मोठा लोंढा परिसरात आल्याने वाहतूक धीम्या गतीने चालते.” असे वाहतूक अधिकाऱ्यांनी याबाबत बोलताना सांगितले.
काही महिन्यापूर्वी येथील हिरानंदानीत होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्त्यांना वन-वे करून पाहण्याचा प्रयत्न वाहतूक विभागाच्यावतीने करण्यात आला होता. मात्र वाहतूक कोंडी कमी होण्याऐवजी वाढल्याने निर्णय मागे घेण्यात आला.
“वाहतूक कोंडीच्या समस्यांची आणि त्याच्यावर उपाययोजना सुचवणाऱ्या अनेक तक्रारी येथील स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था यांच्याकडून वाहतूक शाखेला मिळाल्या आहेत. ज्याच्यावर अभ्यास करून वाहतूक विभागाने सुरुवातीला हिरानंदानीतील दोन प्रमुख रस्त्यांना नो पार्किंग झोन घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे” असे याबाबत बोलताना साकीनाका वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. ए. माने यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “चांदिवलीकडून विक्रोळी आणि जेव्हीएलआरकडे जाणारी वाहने असोत किंवा विक्रोळीकडून चांदिवलीकडे जाण्यासाठी येणारी वाहने असोत सर्वच सर्व वाहने या प्रमुख मार्गानेच प्रवास करतात त्यामुळे या रोडवरील पार्किंग हटवल्यास वाहनांना मोठा आणि मोकळा रस्ता मिळेल आणि वाहतूक कोंडी कमी होईल असे अभ्यासाअंती समोर आले आहे. आम्हाला मिळालेल्या आदेशानुसार आम्ही या रस्त्यांवरील परिसरात तशा सूचना देणारे वाहतुकीचे फलक लावण्याचे काम सुरु केले आहे. लवकरच याच्यावर अंमलबजावणी सुरु होईल.”
काम सुरळीत पार पडावे आणि वाहतूक पोलिसांना मदत म्हणून जादा ट्राफिक वार्डन्सची सोय केली असल्याचे यावेळी हिरानंदानी समूहाचे जनरल मॅनेजर (सिक्युरिटी) संजय सिंग यांनी सांगितले.
No comments yet.