आई वडिलांनी शाळेत जावू दिले नाही म्हणून पवईतील एका भाऊ – बहिणीने बुधवारी सायकलने शाळेकडे धाव घेतली. मात्र मुले न सांगता अचानक गायब झाल्याने पालकांची चांगलीच तारांबळ उडाली. माहिती मिळताच पवई पोलिसांनी काही मिनिटातच तांत्रिक माहितीच्या साहाय्याने त्यांना शोधून काढून पालकांच्या स्वाधीन केले.
राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याने या पार्श्वभूमीवर शाळा कॉलेज सुरु करण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. मंगळवार १ फेब्रुवारीपासून राज्यात शाळा सुरू झाल्या आहेत. “हेच पाहता पालिकेत काम करणारे आणि पवईतील फिल्टरपाडा भागात राहणाऱ्या सगरे यांच्या दोन मुलांनी, [मुलगा (११ वर्षे) व मुलगी (९ वर्ष)] जे साकीनाका येथील शाळेत शिकतात त्यांनी शाळेत जाण्याची मागणी केली होती. मात्र पुढच्या आठवड्यापासून जा असे म्हणत सगरे यांनी त्यांना बुधवारी शाळेत जाण्यास मनाई केली होती.’ असे पोलिसांनी सांगितले.
“दुपारी २ वाजता मुले शाळेची बॅग घेवून सायकल वरून घरातून निघाली असून, घरी परतली नसल्याचे सगरे यांनी पोलीस ठाण्याला येवून माहिती दिली,” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल पठारे यांनी सांगितले.
गंभीरता लक्षात घेता गुन्हेप्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील आणि पथकाने त्वरित सीसीटीव्ही फुटेज तपासत मुलांचा शोध सुरु केला होता.
“घरातून बाहेर पडल्यानंतर मुले साकीविहार रोडमार्गे गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले होते. त्या अनुषंगाने पवई आणि चांदिवली भागातील विविध परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मुले सायकलवरून नहार चौकापर्यंत जावून पुन्हा परत पवईच्या दिशेने आल्याचे आढळून आले,” असे यासंदर्भात बोलताना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी सांगितले.
अखेर तांत्रिक माहितीच्या आधारे दोन्ही मुलांना शोधून काढत पवईतील नीटी जवळील भागातून त्यांना ताब्यात घेवून त्याच्या पालकांच्या हवाली करण्यात आले आहे.
No comments yet.