कुंपणाने शेत खाल्याची म्हण आपण ऐकलीच असेल, मात्र पवईतील उच्चभ्रू वस्ती असणाऱ्या हिरानंदानी भागात ही म्हण प्रत्यक्षात घडलेली पाहायला मिळाली. एका ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या एका २३ वर्षीय महिलेने ज्येष्ठ नागरिकांच्या घरात चोरी करत हिरे, सोने, चांदीचे दागिन्यांसह रोख रक्कम असा २.७ कोटी रुपयांच्या डल्ला मारला. मदतीसाठी ठेवलेल्या महिलेवर विश्वास ठेवत कुटुंबियांनी तिच्या ताब्यात कपाटाच्या चाव्या दिल्या, याचाच फायदा घेत काही महिन्यांच्या कालावधीत महिलेने ही चोरी केली.
तक्रारदार या व्यवसायाने डॉक्टर असून, त्यांच्या ८५ वर्षीय सासूची काळजी घेण्यासाठी मूळची छत्तीसगड येथील असणाऱ्या अंजू भगत हिला पाच वर्षापूर्वी केअरटेकर म्हणून कामावर ठेवले होते. भगत ज्येष्ठ नागरिकांसोबत त्याच घरात राहत होती. घरातील आवश्यक सामानांची खरेदी, खाते व्यवहार आणि ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवण्यात आली होती.
“अनेक वर्ष ज्येष्ठ नागरिकाची काळजी घेत असल्याने कुटुंबाचा विश्वास संपादन केल्याने कुटुंबाने घराच्या चाव्या आणि कपाटाच्या चाव्या भगत हिच्याकडे सोपवल्या होत्या. कुटुंबाने त्यांचे दागिने आणि वडिलोपार्जित मौल्यवान वस्तू याच कपाटात ठेवल्या होत्या” असे पोलिसांनी सांगितले.
नोव्हेंबर महिन्यात ज्येष्ठ नागरिक नाशिकला गेले असताना भगत त्याच घरात राहत होती. जानेवारी महिन्यात तक्रारदार त्यांचा पती आणि मुलगा भारतात आणि परदेशी फिरण्यासाठी निघालेले असताना त्यांना काही दागिने पाहिजे असल्याने त्यांनी कपाटात दागिने पाहिले मात्र त्यांना ते मिळून आले नाहीत.
फेब्रुवारी महिन्यात ज्येष्ठ नागरिक आणि तक्रारदार यांचे कुटुंब मुंबईत परतले तेव्हा त्यांनी कपाटात दागिने तपासले असता मिळून आले नाहीत. तक्रारदार आणि तिच्या पतीला भगतवर दागिने चोरी केल्याचा संशय असल्याने त्यांनी तिला विचारपूस केली मात्र तिने याबाबत नकार दिला. त्यामुळे तक्रारदार यांनी घरातील १०.७ लाखाचे दागिने चोरी झाल्याची तक्रार १ मार्चला पवई पोलीस ठाण्यात केली होती.
“याबाबत गुन्हे प्रकटीकरण पथक तपास करत असताना या चोरीच्या गुन्ह्यात भगतचा सहभाग निष्पन्न झाला होता. त्या अनुषंगाने पळून जाण्याच्या तयारीत असताना तिला ताब्यात घेवून तिच्याकडे कसून चौकशी केली असता तिने घरातून दागिने आणि रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली,” असे यासंदर्भात आवर्तन पवईशी बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांनी सांगितले.
मात्र चोरीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यास सुरुवात झाल्यावर सगळेच अवाक झाले. “अंदाजे ४ महिन्याच्या कालावधीत तिने घरातून ४,२०९ ग्रॅम सोन्याचे दागिने, ४२५ ग्रॅम चांदीचे दागिने ज्यांची अंदाजे किंमत २,६९,५६,७१५/- रूपये आहे. तर रोख रक्कम ६०,८०० रूपये असे एकूण २,७०,१७,५१५ रुपयाची चोरी केली होती. हा संपूर्ण मुद्देमाल आम्ही तिच्या ताब्यातून हस्तगत केला आहे,” असे आवर्तन पवईशी बोलताना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कांबळे यांनी सांगितले.
भादवि कलम ३८१ नुसार गुन्हा नोंद करून भगत हिला अटक करण्यात आली असून, तिचा मुंबई किंवा इतर राज्यात अशा किंवा इतर काही गुन्ह्यात सहभाग आहे का? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलीस उपायुक्त (परिमंडळ १०) मंगेश शिंदे, सहाय्यक पोलीस उपायुक्त (साकीनाका विभाग) भारतकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक (पवई पोलीस ठाणे) जितेंद्र सोनवणे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) गणेश पाटील यांच्या नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि संतोष कांबळे, सपोनि राहुल पाटील, पोह तानाजी टिळेकर, पोह बाबू येडगे, पोशि रवी ठाकरे, पोशि संदीप सुरवाडे, पोशि सुर्यकांत शेट्टी, मपोशि शीतल लाड, मपोशि वैशाली माधवन, मपोशि भारती आणि पोह पिसाळ पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.
No comments yet.