हिरानंदानी येथे चाकूने हल्ला करणाऱ्या अल्पवयीन विरोधात पवईत गुन्हा दाखल

प्रातिनिधिक छायाचित्र

हिरानंदानी, पवई येथील अॅवलॉन इमारत, हेरिटेज गार्डनजवळ रविवारी रात्री एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करून खूनाचा प्रयत्न करणाऱ्या एका विधीसंघर्ष बालका विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पवई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० वर्षीय फिर्यादी योगेश चौधरी हा मुंबईतील नामांकित महाविद्यालयात शिकतो. रविवार, ८ जानेवारीला तो आपल्या काही मित्रांसोबत पवईतील हिरानंदानी भागातील अॅवलॉन इमारत, हेरिटेज गार्डन, येथे फिरण्यासाठी आला होता.

“योगेश आपल्या मित्रांसोबत हेरिटेज गार्डनजवळ गप्पा मारत उभा असताना ताब्यातील विधीसंघर्ष बालकाने तेथे येवून त्याची पूर्वीची मैत्रिण ही योगेशसोबत गप्पा मारते म्हणून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.” असे पवई पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “तिला सोडवण्यासाठी यातील विधीसंघर्ष बालकास योगेश व त्याचा मित्र अल्ताफ फकीरने पकडले असता विधीसंघर्ष बालकाने त्याचे जवळील चाकू काढून अल्ताफचे पाठीत चाकू भोकसून त्याला जीवे ठार मारण्याचे उद्देशाने जखमी केले. तसेच योगेशवर देखील चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात योगेशच्या हाताला दुखापत झाली.

मित्रांनी जखमी अवस्थेतील योगेश आणि अल्ताफ याला त्वरित हिरानंदानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

योगेशने दिलेल्या तक्रारीवरून भादवि कलम ३०७, ३२४, ५०४ अन्वये पवई पोलिसांनी विधीसंघर्ष बालका विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. योगेश आणि अल्ताफ दोघेही व्यवस्थित असून, उपचारानंतर दोघानाही घरी सोडण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

, , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!