पवईतील एका चार्टर्ड अकाऊंटंटला त्याच्या घरातील वाय-फाय ब्रॉडबँड सेवेसाठी ऑनलाईन केवायसी करण्याच्या बहाण्याने एका सायबर चोरट्याने ४८ हजार रुपयाला गंडा घातला आहे. सायबर चोरट्याने एक अॅप डाउनलोड करण्यास सांगत तक्रारदार यांच्या फोनचा रिमोट एक्सेस मिळवून प्रत्येकी २४ हजाराच्या दोन व्यवहाराद्वारे पैसे ट्रान्सफर केले.
७ एप्रिल रोजी तक्रारदार यांनी आपल्या घरात ब्रॉडबँड सेवा सुरु केली होती. काही आठवड्यांतच सेवेतील राउटरने कार्य करणे बंद केले, परंतु कुटुंबियांनी सेवा प्रदात्याकडे याबाबत कोणतीही तक्रार नोंदविली नव्हती. २६ एप्रिल रोजी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास तक्रारदार यांना फोन आला. कॉलरने स्वत:ची ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाईडरचा कर्मचारी म्हणून ओळख करून दिली आणि सांगितले की सेवेसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आणि यामुळेच आपला वाय-फाय कनेक्शन बंद झाले आहे.
“ई-केवायसीसाठी सहकार्य करण्याच्या बहाण्याने कॉलरने तक्रारदार यांच्या फोनवर ‘क्विक सपोर्ट’ नावाचे अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. यामुळे त्याला त्यांच्या मोबाईलचा रिमोट एक्सेस मिळला,” असे पोलिसांनी सांगितले.
माझ्या मुलाचे क्रेडिट कार्ड वापरुन, मी इंटरनेट सेवा प्रदात्याच्या अॅपच्या बिल देय पर्यायात १० रुपये भरले. कॉलर अद्याप माझ्याशी बोलत असतानाच माझ्या मुलाला त्याच्या फोनवर त्याच्या बँक खात्यातून २४,००० रुपयांची रक्कम दोनदा डेबिट झाल्याचा संदेश प्राप्त झाला. माझ्या मुलाने तातडीने मला याबाबत सतर्क केले, असे तक्रारदार यांनी पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी पवई पोलिस स्टेशन गाठले आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली.
No comments yet.