कोरोना महामारीच्या काळात नागरिक आर्थिक अडचणीचा सामना करत असतानाच वीज कंपनीकडून आलेल्या वाढीव वीज बिला विरोधात पवईत नागरिक आणि महिला संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. प्रेरणा महिला मंडळाच्या नेतृत्वाखाली पवईतील महिलांनी हे आंदोलन केले.
कोरोनाने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. या महामारीमुळे लोकांना घरात बसण्याचे दिवस आले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. उद्योगधंदे बंद पडले आहेत. अनेकांच्या पगारात कपात करण्यात आली आहे. संपूर्ण अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना जून महिन्यात अनेकांना मोठ्या रकमेची वीजबिले हाती आली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात वीजबिल मिळाल्याने अनेकांना आता काय करायचे असा प्रश्न उभा ठाकला आहे.
“चार महिने झोप काढणारी वीजबिल कंपनी अचानक जागी होत त्यांनी कोणतेही मीटर रीडिंग न घेता नागरिकांना मनमानी बिले पाठवली आहेत. आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरिकांनी ही बिले भरायची तरी कशी? याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आज वीज कंपनीच्या कार्यालयाजवळ आंदोलन केले” असे याबाबत बोलताना संतोष गाडे यांनी सांगितले.
यावेळी नागरिकांच्यावतीने प्रेरणा महिला मंडळाच्यावतीने निवेदन देत, लॉकडाऊन काळातले वीज देयक माफ करावे. वाढीव देयकात सुधारणा करून द्यावी. देयक रक्कम टप्प्या-टप्प्याने भरण्यासाठी सवलत द्यावी. व्याज आकारणी करू नये. देयक रक्कम भरण्यास विलंब झाल्यास वीज पुरवठा खंडित करू नये. यासारख्या मागण्या वीज कंपनीकडे करण्यात आल्या आहेत.
“घरातील अर्थव्यवस्थेचा गाडा ह्या घरातील महिला सांभाळत असतात. अशावेळी घरात आर्थिक आवक नसताना उभे ठाकलेल्या संकटाचा सामना कसा करायचा असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर असताना त्यांनी आमच्या संस्थेसमोर हा प्रश्न मांडला होता. ज्याला पाहता आम्ही आज वीजकंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेत वीजबिल कमी करण्याच्या मागणी सोबतच इतर मागण्या ठेवल्या आहेत ज्यातील काही त्यांनी मान्य केल्या आहेत,” असे याबाबत बोलताना प्रेरणा महिला मंडळाच्या अध्यक्षा संजीवनी गायकवाड यांनी सांगितले.
या आंदोलनाची दखल घेत सहाय्यक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, नीटी पवई यांनी शिष्टमंडळाला विजबिलाची रक्कम समजावून सांगत, महिला मंडळातर्फे करण्यात आलेल्या काही मागण्या शासकीय अटीवर मंजूर केल्या आहेत.
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
No comments yet.