कोव्हीड १९ आजारावर उपचार घेतल्यावर कोरोना मुक्त झालेले वृद्ध दाम्पत्य पवईतील आपल्या राहत्या घरी, चाळ सदृश्य वसाहतीत परतल्यानंतर येथील नागरिकांनी टाळ्या वाजवत त्यांचे स्वागत केले. चाळकरयांच्या या स्वागताने भारावलेल्या या वृद्ध दांम्पत्यास यावेळी आपले अश्रू अनावर झाले.
चाळीतील सदस्यांनी आपल्या दारात आणि बाल्कनीत उभे राहत टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. अशा कृतीमुळे समाजातही सकारात्मक संदेश दिला जात असून, त्यामुळे कोरोना बाधित रुग्ण त्यांचे कुटुंबीय आणि उपचार करणारे आरोग्य सेवेतील कर्मचारी यांना मानसिक आधार आणि दिलासा मिळत आहे.
मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका ‘एस’ विभाग ज्यात पवई सुद्धा येते, येथे १५ एप्रिल पर्यंत कोरोना बाधितांचा आकडा ७१वर पोहचला आहे. तर, पवई परिसरात कोरोना विषाणूने बाधित रुग्णांची संख्या ७ वर पोहचली आहे. यातील ६ लोकांना उपचार करून निगेटिव्ह टेस्ट आल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर ४ दिवसापूर्वी पॉझिटीव्ह सापडलेल्या तरुणावर पवईतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाकडून मिळत आहे.
पवईतील चाळ सदृश्य वस्तीत राहणाऱ्या एक वृद्ध दांम्पत्य ८ एप्रिल २०२० रोजी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. यापूर्वी सापडलेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांना या आजाराने ग्रासल्याची शक्यता पालिकेने वर्तवली होती. त्यांच्यावर पवईतील एका खाजगी कोरोना रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांच्या कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्याने कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
वृद्ध दांत्याने यशस्वी रित्या या कोरोना विषाणूंशी लढत यावर मात केली. रुग्णालयातून बाहेर पडत मोकळा श्वास घेत १६ एप्रिल २०२० दुपारी ४च्या सुमारास सोसायटीच्या आवारात प्रवेश करताच येथील सर्व रहिवाशांनी आपापल्या घराच्या बाहेर आणि बाल्कनीत उभे राहत टाळ्या वाजवून त्यांचे पुन्हा नव्याने चाळीत स्वागत केले.
वृद्ध दांम्पत्यास अश्रू अनावर
दोघेही सोसायटीच्या आवारात येताच टाळ्यांच्या गडगडाट ऐकून आणि चाळकऱ्यांच्या या स्वागताने भारावून गेलेल्या दांम्पत्याला आपले अश्रू अनावर झाले. “आम्ही संपूर्ण चाळ नेहमीच एक कुटुंबाप्रमाणे राहिलो आहोत. आमच्या कुटुंबातील हे दांम्पत्य कोरोना विरोधातील एक मोठी लढाई जिंकून परतले आहे. त्यामुळे आम्ही रहिवाशांनी त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव करत त्यांना धीर देत त्यांचे नव्याने आपल्या परिवारात स्वागत केले.” असे याबाबत बोलताना चाळकरयांनी सांगितले.
नागरिकांच्या या अशा कृतीमुळे समाजातही सकारात्मक संदेश दिला जात असून, त्यामुळे उपचार करणारे आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि कोरोना बाधित रुग्ण त्यांचे कुटुंबीय यांना मानसिक आधार आणि दिलासा मिळत आहे. त्यामुळे या महामारीशी लढण्यासाठी संपूर्ण देश पुन्हा एक नव्या उमेदीने सज्ज होत आहे. आवर्तन पवई नागरिकांना विनंती करते की या सर्वांना तुमच्या प्रेमाची आणि धीराची गरज आहे त्यांचा तिरस्कार न करता त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी कार्य करा.
बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा
No comments yet.