२७ फेब्रुवारी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ मराठी साहित्यिक, कवी वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ पासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. या दोन्हीचे औचित्य साधत पवई इंग्लिश हायस्कूल ने गुरुवार, २७ फेब्रुवारीला मराठी संस्कृतीच्या विविध अंगांना उजाळा देत ‘मराठी भाषा दिवस’ साजरा केला.
मराठी मातीचा झेंडा अटकेपार घेवून जाणारे जागतिक विक्रम निर्माते पवईकर मोझाक आर्टिस्ट चेतन राऊत यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका लता प्रसाद पिल्लाई, श्रीमती बिनू नायर, शिक्षकगण आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन, मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसानिमित्त मातृभाषेची महती, माहिती, मातृभाषेचे व्यक्तिगत व समाज जीवनातील स्थान, मानसशास्त्रीय व शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने महत्त्व या विषयांवर कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना शाळा, महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. मात्र या दिवसाचे महत्त्व केवळ सरकारी आदेशाचे पालन करण्यापुरते व अहवाल सादर करण्यापुरतेच शाळांनी ठेवले आहे.
राज्यातील प्रत्येक शाळेला मराठी विषय अनिवार्य असेल, असा निर्णय घेण्यात आला. मराठी विषय शिकवला नाही शाळांनी याबाबत आडमुठेपणा केल्यास त्यांना प्रथम दंड व नंतर मान्यता रद्द होईल, असे निर्णयही होत आहे. मात्र, प्राथमिक टप्प्यावर मराठी शाळाच मराठी भाषा संवर्धनाकडे गांभीर्याने बघत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत असताना पवई परिसरातील पहिली वहिली इंग्रजी माध्यमातील शाळा या संस्कृतीला जपण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.
आज मराठी भाषा दिनानिमित्त मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन शाळेच्या सभागृहात करण्यात आले होते. संत काळापासून, शिवसंस्कृती आणि विज्ञान संस्कृती पर्यंत मराठी भाषेच्या वाटचालीवर शाळेच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटक, गायन कलेतून विविधतेने नटलेल्या मराठी भाषेचे दर्शन घडवले.
“माझी जडणघडण सुद्धा याच शाळेच्या प्रांगणात झाली आहे. एक इंग्रजी माध्यमातील शाळा विविध संस्कृतींना जपण्याचा करत असणारा प्रयत्न खरच खूपच कौतूकास्पद आहे.” असे मत यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे चेतन राऊत यांनी व्यक्त केले.
मराठी ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. कोंकणी, अहिराणी, माणदेशी, मालवणी, वऱ्हाडी, कोल्हापूरी, खानदेशी, चंदगडी, नागपुरी, बेळगावी, पारूशी, मराठवाडी, कोळी अशा मराठीत ठराविक अंतरावर बदलणाऱ्या बोलीभाषा आहेत. अशा समुद्ध वारसा लाभलेल्या या भाषेला टिकवण्याचे कार्य पवईतील ही शाळा करत असताना मराठी भाषा शिक्षकांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
प्रमुख पाहुणे आणि शाळेच्या मुख्याद्यापिकांच्या हस्ते गायन, नृत्यसह विविध कलांमध्ये ठसा उमठवणाऱ्या विद्यार्थ्याचा सन्मान सुद्धा यावेळी करण्यात आला.
No comments yet.